मोलकरणीने मारला सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला

शाहूपुरी पोलिसांकडून गुन्हा उघड; साडेदहा तोळे दागिने हस्तगत

by Team Satara Today | published on : 02 July 2025


सातारा : शाहूपुरी, अवधूत कॉलनी येथे घरात झालेल्या सोन्याच्या दागिन्यांच्या चोरी प्रकरणाचा शाहूपुरी पोलिसांनी कौशल्यपूर्वक तपास करून या प्रकरणाचा छडा लावला आहे. घरात काम करणार्‍या मोलकरणीने नऊ लाख साठ हजार रुपये किमतीच्या साडेदहा तोळे दागिन्यावर डल्ला मारला होता. याप्रकरणी संबंधित मोलकरणीविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

महेंद्र पवार रा. अवधूत कॉलनी, सातारा यांनी दिनांक 17 मे रोजी घरात दागिन्यांची चोरी झाल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली होती. पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन म्हेत्रे यांनी आपल्या पथकाला या गुन्ह्याबाबत विशेष तपासाच्या सूचना दिल्या होत्या. 

त्यानुषंगाने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक के. डी. ढेरे यांनी तपास केला असता घरकामासाठी येणार्‍या महिलेने चोरी केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले. फिर्यादीच्या आईचे निधन झाले असताना घरातील गडबडीच्या वातावरणाचा फायदा घेऊन या महिलेने नऊ लाख साठ हजार रुपये किंमतीच्या साडेदहा डोळ्यांच्या सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारला होता. हा संदर्भ घेऊन पोलिसांनी तपास केला फिर्यादी यांच्या घरी मोलकरणीच्या व्यतिरिक्त कोणीही यादरम्यान आले नव्हते म्हणून पोलिसांचा संशय बळावला. या महिलेची पोलिसांनी कसून चौकशी केली असता तिने सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरे दिली. मात्र गुन्ह्याच्या संदर्भाने प्रश्न विचारले असता तिने सोन्याचे दागिने चोरल्याचे कबूल केले. पोलिसांनी काही दागिने घरातून हस्तगत केले, तर काही दागिने सोनाराकडे तिने गहाण ठेवल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले. सदर महिलेवर यापूर्वीही अन्य एका गुन्ह्यामध्ये चोरीचा गुन्हा दाखल झालेला आहे.

या तपासात पोलीस अंमलदार सुरेश घोडके, मनोज मदने, निलेश काटकर, ज्योतीराम पवार, महेश बनकर, अभय साबळे, सचिन पवार, स्वप्निल सावंत, स्वप्निल पवार, सुमित मोरे, संग्राम फडतरे, महिला पोलीस अंमलदार माधुरी शिंदे, कोमल पवार, गायत्री गुरव यांनी सहभाग घेतला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
प्राथमिक शिक्षक बँकेच्या चेअरमन पदी पुष्पलता बोबडे
पुढील बातमी
मोबाईल चोरी करणारी परप्रांतीय महिला पोलिसांच्या ताब्यात

संबंधित बातम्या