जन्म-मृत्यू दाखल्यासाठी हेलपाटे टळणार; प्रायोगिक तत्त्वावर होणार दोन उपकेंद्रे : अ‍ॅड. डी. जी. बनकर

by Team Satara Today | published on : 05 February 2026


सातारा : सातारा शहराच्या हद्दवाढीनंतर शाहूपुरी, गोडोली, शाहूनगर, विलासपूर, पिरवाडी आदी नव्याने पालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या भागांतील नागरिकांना जन्म व मृत्यू दाखले मिळविण्यासाठी केसरकर पेठेतील नगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात वारंवार हेलपाटे मारावे लागत होते. लांबचा प्रवास, वेळेचा अपव्यय व आर्थिक खर्च यामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग आणि गरजू घटकांची मोठी गैरसोय होत होती. नागरिकांच्या या अडचणींची गंभीर दखल घेत उपनगराध्यक्ष अ‍ॅड. डी. जी. बनकर यांनी संबंधित विभागाची तातडीची बैठक घेऊन हद्दवाढीतील भागातच जन्म-मृत्यू दाखल्यांची स्वतंत्र सुविधा केंद्रे सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

नागरिकांचा त्रास कमी व्हावा आणि सेवा त्यांच्या दारापर्यंत पोहोचावी, या उद्देशाने प्रायोगिक तत्त्वावर शाहूपुरी व गोडोली परिसरात स्वतंत्र कर्मचारी नेमून तेथेच जन्म-मृत्यू दाखले देण्याचे नियोजन करण्याच्या सूचना बनकर यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

पालिका कार्यालय दूर असल्याने नागरिकांचे वेळ व पैशाचे नुकसान होत आहे. हा त्रास टाळणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. नागरिककेंद्री दृष्टिकोन ठेवून सेवा सुलभ आणि सहज उपलब्ध करणे आवश्यक आहे, असे उपनगराध्यक्ष अ‍ॅड. बनकर यांनी अधिकार्‍यांना बैठकीत स्पष्ट शब्दांत सांगितले. तसेच ज्येष्ठ नागरिक, महिला व सर्वसामान्यांची गैरसोय होऊ नये, हा प्रशासनाचा मूलभूत हेतू असला पाहिजे, असे स्पष्ट करत हद्दवाढीतील नव्याने समाविष्ट भागातच सेवा पोहोचविण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

या निर्णयानुसार, नगरपालिकेची वसुली कार्यालये असलेल्या गोडोली व सदरबझार परिसरात तसेच नव्याने समाविष्ट शाहूपुरी येथील ग्रामपंचायत कार्यालयात प्रथम प्रायोगिक तत्त्वावर जन्म-मृत्यू दाखल्यांची स्वतंत्र सुविधा केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांना शहरातील मुख्य कार्यालयात जाण्याची गरज राहणार नाही. या उपक्रमामुळे शाहूपुरी, गोडोली, शाहूनगर, पिरवाडी आदी भागांतील हजारो नागरिकांना दिलासा मिळणार असून उपनगराध्यक्ष पदाधिकारी, प्रशासन नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन काम करत असल्याचे दिसून येते.

दरम्यान, यापूर्वी प्रथम मुलगी जन्माला आलेल्या कुटुंबाला मोफत जन्मदाखला देण्याचा अभिनव उपक्रम उपनगराध्यक्ष बनकर यांनी सुरू केला होता. कालांतराने तो बंद पडला होता. हा लोकाभिमुख उपक्रम पुन्हा सुरू करण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. तसेच, लवकरच नगरपालिका कार्यालय नव्या इमारतीत स्थलांतरित होणार असून, त्या ठिकाणी पालिकेची संपूर्ण यंत्रणा डिजिटल करून ‘डिजिटल नगरपालिका कार्यालय’ उभारण्याचा निर्धार असल्याचेही उपनगराध्यक्ष बनकर यांनी यावेळी स्पष्ट केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कुख्यात ‘डीडी गँग’मधील ६ सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी हद्दपार; शाहूपुरी परिसरात दहशत माजवणाऱ्या टोळीवर पोलिसांची कडक कारवाई
पुढील बातमी
सदरबाजारात कोयना सोसायटीजवळ उभ्या ट्रकला भीषण आग; लाखोंचे नुकसान

संबंधित बातम्या