सातारा : करंजे, ता.सातारा येथील आंदेकर चौक परिसरात गुरुवारी दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात वृषभ जाधव (वय ३०, रा. रविवार पेठ, सातारा) या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हल्लेखोरांनी कोयत्याने मारहाण केल्याने परिसरात खळबळ उडाली. या युवकाचा उपचारादरम्यान खाजगी रुग्णालयात मृत्यू झाल्याने शाहूपुरी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा या यंत्रणा तात्काळ सतर्क झाल्या.पोलीस युद्ध पातळीवर संबंधित संशयितांचा शोध घेत असून जुन्या भांडणातून हा कोयता हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.जाधव याच्या कुटुंबीयांची जिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते .
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आंदेकर चौकात वृषभ जाधव याच्यावर तीन ते चार जणांकडून अचानक कोयत्याने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्यांच्या पायाला,डोक्याला गंभीर जखम झाली. मारहाण करणाऱ्यांनी जाधव याला करंजे परिसरातून पुन्हा मंगळवार पेठ नेले व तेथेही बेदम मारहाण केली .या मारहाणी मध्ये जाधव अत्यंत गंभीर जखमी झाला. अंतर्गत रक्तस्त्राव होत असल्याने जखमी अवस्थेत त्याला तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
घटनास्थळी चप्पल,घड्याळ आणि रक्ताचा सडा पडला होता. हल्ला सुरू असताना नागरिक भयभीत झाले होते. हल्ल्यानंतर नागरिकांनी गर्दी केली, घटनेची माहिती समजतात शाहूपुरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. शाहूपुरी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे मारेकऱ्यांचा शोध सुरू केला आहे.
घटनेनंतर जाधव यांचे नातेवाईक व मित्रांनी रुग्णालय परिसरात मोठी गर्दी केली.यावेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी रुग्णालय परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला होता. डॉक्टरांनी मृत्यूची अधिकृत माहिती दिल्यानंतर मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.दरम्यान, घटनेनंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले असून शाहूपुरी पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.अगोदरच्या भांडणाचा राग मनात धरून हा हल्ला केला असल्याची चर्चा दिवसभर सातारा शहरात पसरली होती.
अक्षय जाधव हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. साताऱ्यात राजवाडा परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणात येईल त्याचा सहभाग असल्याची पोलिसांची माहिती आहे. या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत शाहूपुरी पोलिसांची पथके संशयितांचा शोध घेत होती.