सातारा : शहरातील शाहूपुरी परिसरात शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे सातत्याने करणाऱ्या कुख्यात ‘डीडी गँग’मधील सहा सराईत गुन्हेगारांना सातारा जिल्ह्याच्या हद्दीतून दोन वर्षांच्या कालावधीसाठी हद्दपार करण्यात आले आहे. आगामी निवडणूक काळाच्या पार्श्वभूमीवर शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सातारा पोलिसांनी ही कडक कारवाई केली आहे.
हद्दपार करण्यात आलेल्यांमध्ये टोळी प्रमुख धैर्यशिल उर्फ धिरज जयसिंग ढाणे (वय ३३, रा. चिमणपूरापेठ, सातारा) याच्यासह युवराज सुरेश मुरारी (वय ३०, मंगळवार पेठ), साद अय्याज बागवान (वय २२, शनिवार पेठ), प्रसन्न नारायण दीक्षित (वय २५, व्यंकटपुरा पेठ), योगेश ऊर्फ बॉबी भिमराव देवकर (वय ३१, मंगळवार पेठ) आणि प्रितम सोमनाथ साळुंखे (वय २८, दिव्यनगरी, कोंडवे) यांचा समावेश आहे.
या टोळीवर जबर दुखापत, जबरी चोरी, अवैध अग्निशस्त्र बाळगून खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीर जमाव जमवून दंगा मारामारी, शिवीगाळ व दमदाटी, अनधिकृत गृहप्रवेश, विनयभंग तसेच हद्दपार आदेशाचे उल्लंघन यासारखे गंभीर व दखलपात्र गुन्हे दाखल आहेत.वारंवार अटक व प्रतिबंधात्मक कारवाई करूनही टोळीची गुन्हेगारी कारवाई सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
शाहूपुरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये संपूर्ण सातारा जिल्ह्यातून हद्दपारीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक तथा हद्दपार प्राधिकरण यांच्याकडे सादर केला होता. या प्रस्तावाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांनी केली.सदर प्रकरणी पोलीस अधीक्षक तथा हद्दपार प्राधिकरण तुषार दोशी, सातारा यांच्यासमोर सुनावणी होऊन संबंधित सहा आरोपींना दोन वर्षांसाठी सातारा जिल्हा हद्दीतून हद्दपार करण्याचा आदेश पारित करण्यात आला आहे.
या कारवाईदरम्यान सरकार पक्षाच्या वतीने अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्यासह पोलीस अधिकारी व अंमलदारांनी ठोस पुरावे सादर केले.आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारी, मोक्का व एमपीडीए अंतर्गत आणखी कठोर कारवाया करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.