'आनंदबन' या दिव्यांगांच्या शाळेच्या मदतीसाठी शुक्रवारी 'शिवतांडव'; रोटरी क्लब ऑफ सातारा कॅम्पतर्फे आयोजन

by Team Satara Today | published on : 11 February 2026


सातारा : सातारा येथील 'आनंदबन' या दिव्यांग मुलांच्या शाळेसाठी रोटरी क्लब ऑफ सातारा कॅम्पतर्फे शुक्रवारी (दि. १३) सायंकाळी सात वाजता शाहू कलामंदिरात 'शिवतांडव' या शास्त्रीय गायन व वादनाच्या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

पत्रकार भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत क्लबच्या अध्यक्षा नीलिमा निकम यांनी ही माहिती दिली. यावेळी क्लबच्या सचिव वैशाली निंबाळकर, ट्रस्टचे चेअरमन डॉ. जवाहरलाल शहा, प्रकल्प प्रमुख स्वप्निल वराडकर उपस्थित होते.

रोटरी क्लब ऑफ सातारा कॅम्प ट्रस्ट संचलित आनंदबन ही बौद्धिक दिव्यांग असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीची शाळा व व्यवसाय प्रशिक्षण केंद्र मागील ३६ वर्षांपासून सातारा येथील नवीन औद्योगिक वसाहतीत स्वतःच्या जागेमध्ये कार्यरत आहे. सन १९९० साली छत्रपती शाहू स्टेडियममधील एका वर्गामध्ये केवळ ८ मुले घेऊन सुरू झालेल्या या शाळेमध्ये सध्या ४८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तसेच इतरांप्रमाणे त्यांनाही स्वतंत्रपणे जीवन जगता यावे ही संकल्पना विचारात घेऊन बौद्धिक अक्षम असणाऱ्या १८ वर्षांपुढील विद्यार्थ्यांकरिता सन २००० साली व्यवसाय प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली. केवळ १४ विद्यार्थी घेऊन सुरू करण्यात आलेल्या या व्यवसाय प्रशिक्षण केंद्रामध्ये सध्या ५७ विद्यार्थी व विद्यार्थिनी शिक्षण व प्रशिक्षणाचा लाभ घेत आहेत. तसेच विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे संस्थेने विविध ठिकाणी येथील ३० दिव्यांग प्रशिक्षणार्थीचे पुनर्वसन केलेले आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

वाढती विद्यार्थी संख्या व खास सर्व पालकांच्या आग्रहास्तव बौद्धिक अक्षम असणाऱ्या मुले व मुली यांच्यासाठी निवासी शाळा व व्यवसाय प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी मुबलक जागेची आवश्यकता आहे. परंतु दिव्यांग मुलांच्या स्वप्नांना सुरक्षित छत देणाऱ्या या मानवतावादी उपक्रमास समाजातील दानशूर व्यक्तींकडून पुरेसा निधी उपलब्ध करावा लागणार आहे. त्यासाठीच रोटरी क्लब ऑफ सातारा कॅम्प ट्रस्टमार्फत कृष्णा साळुंखे यांच्या पखवाजवरील शिवतांडव या प्रसिद्ध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. याची तिकिटे ७००, ५००, ३०० रुपयेप्रमाणे उपलब्ध असून नागरिकांनी ९४२१९९४०७८ (आनंदबन), ९८५०८४६१६६ (स्वप्निल), ७०६६३५१९३१ (नीलिमा) क्रमांकावर संपर्क साधून आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा व या सामाजिक उपक्रमाला पाठिंबा द्यावा असे आवाहन स्वप्निल वराडकर आणि सर्व रोटरी सदस्यांनी यावेळी केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वरिष्ठ आणि प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय - ना. मकरंद पाटील; माझ्या व पाटण मतदारसंघात बाहेरच्या मंत्र्यांची घुसखोरी, गोरे यांना त्यांचे नाव न घेता टीका
पुढील बातमी
अनैतिक संबंधाच्या संशयातून खून करुन पेटवले; चौघांना अटक ; स्थानिक गुन्हे शाखा, लोणंद पोलिसांची कारवाई

संबंधित बातम्या