सातारा : नांदागिरी, धुमाळवाडी येथील वीर जवान गणेश बाजीराव शिंदे (वय ३८) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही बातमी समजताच नांदगिरी गावावर शोककळा पसरली. शुक्रवारी दुपारी शहीद जवान गणेश शिंदे अमर रहे च्या घोषणा देत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुली, भाऊ असा परिवार आहे.
कोरेगाव तालुक्यातील नांदगिरी गावचे कै. बाजीराव जिजाबा शिंदे यांच सुपुत्र जवान गणेश बाजीराव शिंदे लखनऊ युनिट ६८१ टीपीटी एएससी कार्यरत होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण नांदगिरी हायस्कूल याठिकाणी झाले. त्यानंतर बारावी गदककर हायस्कूल सातारा रोड या ठिकाणी पूर्ण करून ते देशसेवा करण्यासाठी भरती झाले. आईला घेऊन जाण्यासाठी सुट्टीवर आले असता त्यांच्या अचानक पोटात दुखू लागले. त्यांना पुणे येथील कमांड हॉस्पिटल याठिकाणी ॲडमिट करण्यात आले. परंतु त्यांचा उपचारादरम्यानच मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. नांदगिरी गावातील सार्वजनिक मंडळे, ग्रामस्थांनी फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीमधून शहीद जवान गणेश शिंदे यांची अंत्ययात्रा काढली. यावेळी वीर जवानच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. दुपारी उशिरापर्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यविधी पार पडला. यावेळी नांदगिरी गावचे सर्व ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सैनिक संघटना, सर्व शासकीय अधिकारी, आमदार महेश शिंदे, आ. शशिकांत शिंदे उपस्थित होते.