सातारा : 31 डिसेंबरच्या मेजवानीसाठी सांबरवाडी परिसरात गेलेल्या चौघा युवकांपैकी एक युवक अंधारात अंदाज न आल्याने तोल जाऊन 200 फूट दरीत कोसळल्याची घटना घडली. या घटनेमध्ये या युवकाचे प्राण वाचले असले तरी तो गंभीर जखमी झाला आहे. आदित्य कांबळे (रा. क्षेत्रमाहूली) असे त्या युवकाचे नाव असून शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू पथकाने शोध मोहीम करून त्याचे प्राण वाचवले आहेत.
याबाबतची अधिक माहिती अशी, आदित्य याने आपल्या मित्रांबरोबर 31 डिसेंबरची पार्टी करण्याची नियोजन केले होते. त्यानुसार ते आणि त्याचे तीन मित्र सांबरवाडी परिसरात मेजवानीचे नियोजन केले होते. रात्री साडेदहाच्या दरम्यान गप्पा मारत असताना आदित्य लघुशंका करण्यासाठी तेथून काहीसा दूर दरीच्या बाजूला गेला. अंधारामध्ये त्याला उभे राहण्याचा अंदाज न आल्याने तोल जाऊन सुमारे 200 फूट खोल तो दरीत कोसळला. बराच वेळा गेलेला आदित्य परत न आल्याने मित्रांनी त्याची शोधाशोध केली तो दरीत पडल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी परिसरातील नागरिकांना गोळा केले. या घटनेची तात्काळ खबर साताऱ्यातील शिवेंद्रसिंहराजे भोसले रेस्क्यू टीमला करण्यात आली. या टीमच्या पथकाने रात्री
उशिरा तात्काळ दरीमध्ये उतरून आदित्य याला स्ट्रेचरवरून वर काढले. त्याला उपचारासाठी तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आदित्यच्या जीवाचा धोका टळला असला तरी शरीराला दुखापत झाल्याने त्याच्यावर तातडीचे उपचार सुरू आहे. सातारा तालुका पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असून याबाबत अधिक तपास सुरू आहे.