राज्य शासनाकडून छत्रपतींच्या घराण्याचा सन्मान

खा. उदयनराजेंसह त्यांच्या वारसांना मिळाली जमीन महसुलात सूट

by Team Satara Today | published on : 12 January 2025


सातारा : अखंड महाराष्ट्राचे दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट तेरावे वंशज असणार्‍या खा. उदयनराजे भोसले व त्यांच्या वंशजांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्याचे महत्त्व लक्षात घेऊन खासगी जमिनी व इतर मालमत्ता संदर्भात शासन आदेश काढून महसुलात सूट देण्यात आली आहे. या संदर्भातील आदेश राज्य शासनाने नुकताच पारित केला आहे.

सातार्‍यातील छत्रपती घराण्याला 1953 मध्ये पहिल्यांदा महसुलात सूट देण्यात आली होती. त्यावेळी श्रीमंत शाहू प्रतापसिंहराजे भोसले हे सातारा गादीचे वंशज होते. त्यांच्या निधनानंतर श्रीमंत प्रतापसिंह महाराज शाहू महाराज भोसले यांना 1957 च्या शासन निर्णयानुसार सूट देण्यात आली होती.

त्यानंतर 1980 च्या निर्णयानुसार ही सूट उदयनराजे भोसले यांना देण्यात आली होती.

सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्याचे महत्त्व लक्षात घेऊन घराण्याच्या खाजगी तसेच सरंजामी इनाम या मालमत्ता भारत स्वतंत्र झाल्यानंतर अबाधित ठेवण्यात आल्या होत्या.

1953, 1957 व 1980 च्या निर्णयानुसार पुन्हा एकदा राज्य शासनाने जमीन महसुलात सूट देऊन सातारा येथील छत्रपती घराण्याचा पुन्हा एकदा सन्मान केला आहे.

9 जानेवारी 2025 च्या महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार खा. श्री. छ. उदयनराजे व त्यांच्या वारसांना जमीन महसुलात सूट दिल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
बीड जिल्ह्यातील आणखी एका सरपंचाचा मृत्यू
पुढील बातमी
सातारा स्वाभिमान दिन शाही पद्धतीने साजरा

संबंधित बातम्या