सातारा : महिला व बाल विकास विभागामार्फत बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 अन्वये सातारा जिल्हयात कार्यरत बालगृहातील अनाथ, निराधार, उमार्गी, विधी संघर्षग्रस्त मुला-मुलींच्या अंगी असलेल्या विविध कला गुणांना वाव मिळण्याचे दृष्टीने सातारा जिल्हयातील बालगृहात दाखल असलेल्या व इतर विदयालयातील एकुण 400 प्रवेशितांच्या जिल्हास्तरावरील चाचा नेहरू बालमहोत्सवाअंतर्गतच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन दि.14 ते 16 जानेवारी या कालावधीत पोलीस कवायत मैदान, सातारा येथे संपन्न झाला आहे.
दि. 16 जानेवारी 2026 रोजी दुपारी 12 वाजता सदर बाल महोत्सवाचा समारोप कार्यक्रमाचे करण्यात आले होते. समारोप कार्यक्रमाच्या सुरुवातीस सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट समुह नृत्य सादर केलेल्या एकुण 3 समुह नृत्यांचे सादरीकरण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
समारोप कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, सातारा शिल्पा पाटील यांनी केले. बाल महोत्सवामधील क्रीडा स्पर्धांमध्ये खो-खो, कबड्डी, क्रिकेट, 100 मिटर धावणे, 200 मिटर धावणे, 400 मिटर धावणे, रिले, गोळाफेक, थाळी फेक, लिंबू चमचा, संगित खुर्ची, उंच उडी, लांब उडी, डॉजबॉल इत्यादी क्रिडा स्पर्धा आयोजित केल्या आहेत. बौध्दिक स्पर्धांमध्ये बुध्दीबळ, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये वैयक्तिक नृत्य, समूह नृत्य, समूह गीते या स्पर्धा पार पडलेल्या आहेत. हा बालमहोत्सव अत्यंत उत्साहात पार पडला, मुला-मुलींना सांघिक व वैयक्तिक खेळातील नियमांचे अचूक ज्ञान प्राप्त झाले सदर ज्ञान हे त्यांना पूढील खेळांसाठी निश्चितच फायदेशिर ठरेल असे वक्तव्य करून बाल महोत्सव पार आयोजनामध्ये सहभागी असणा-या सर्व टिमचे त्यांनी आभार मानले. तदनंतर बाल महोत्सवामध्ये सहभागी 2 बालकांनी खेळ व इतर कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव नीना बेदरकर, डॉ. इनामदार, अतिरिक्त जिल्हा शैल्य चिकित्सक हे उपस्थित होते. या दोघीनी खिलाडी वृत्ती जोपासून अभ्यासाबरोबर कला जोपासणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगून उज्ज्वल यश प्राप्त करण्यासाठी मोलाचा संदेश दिला. व खेळ व अभ्यासाची सांगड घालून खेळात विशेष प्राविण्य मिळविल्यास कशा प्रकारे प्रशासकीय अधिकारी हे पद प्राप्त होते याबद्दल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास बाल कल्याण समिती अध्यक्ष व सदस्य ही या समारोप प्रसंगी उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये जनरल चॅम्पीयनशिप मुला-मुलींचे बालगृह सातारा यांना प्राप्त झाली .ज्या मुलां-मुलींने सांघिक तसेच वैयक्तिक खेळामध्ये, सांस्कृतिक कार्यक्रमाध्ये प्राविण्य मिळविले त्यांना ट्रॉफी,मेडल व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले .
सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ॲड.योगेंद्र सातपुते यांनी केले तर आभार प्रदर्शन संरक्षण अधिकारी (क) अजय सपकाळ यांनी मानले. या कार्यमास निरीक्षणगृह, बालगृहातील अधिक्षक, शिक्षक,शिक्षिका कर्मचारी व मुले -मुली 5 नगरपालिका शाळातील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. तसेच जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयातील सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.