सातारा : २७ सप्टेंबर शनिवारी पहाटे झालेल्या अति मुसळधार पावसाने सातारा पंढरपूर महामार्ग पाण्याखाली जावून या रस्त्यावरील व्यापा-यांनी केलेल्या अतिक्रमणामुळे व्यापा-यांचे मोठ्या प्रमाणावर कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. काल रात्री या परिस्थितीची पाहणी ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांनी केली यावेळी या परिस्थितीला ही अतिक्रमणेच जबाबदार असल्याचा नागरिकांनी आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर ना. गोरेे यांनी प्रशासनाला ही अतिक्रमणे ताबडतोब काढून टाकण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार आज पालिका प्रशासन, महसूल प्रशासन यांच्या संयुक्त कारवाईत अतिक्रमणे काढून टाकण्यात आली.
या रस्त्यावर झालेली अतिक्रमणेच याला जबाबदार आहेत. शिंगणापूर चौकात पूर्वी एक पाण्याचा पारंपरिक ओढा होता हा ओढाच गायब झाल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर व्यापा-यांनी अतिक्रमणे केली होती. कालची रस्त्यावरील साठलेल्या पाण्याची परिस्थिती पाहिल्यावर ना. जयकुमार गोरे यांनी प्रशासनाला धारेवर धरत याबाबत ताबडतोब उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे आज प्रशासन अक्शन मोडवर येवून आज रविवार असताना ही तहसिलदार विकास अहिर, अप्पर तहसिलदार मिना बाबर, मुख्याधिकारी डॉ. सचिन माने, सपोनि अक्षय सोनवणे यांच्या उपस्थितीत मोठ्या पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणे काढण्यात आली. यावेळी अतिक्रमण केलेल्या व्यावसयिकांनी स्वत:हून आपली अतिक्रमणे काढून घेतली .
मात्र, या अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली असली तरी या पाण्याचा निचरा होणार का हा प्रश्न अनुत्तरीततच आहे. कारण शिक्षक कॉलनी, काळा पट्टा, महादेव मळा, तावसे वस्ती, तसेच सातारा रोडकडील माणगंगा नदीकडून येणारे पावसाचे पाणी हे या अतिक्रमणणाने गायब झालेल्या ओढ्याने ते पाणी माणगंगा नदीला मिळत होते. मात्र हा ओढाच गायब झाला.त्यामुळे शिक्षक कॉलनीकडून येणाऱ्या पाण्याने सातारा पंढरपूर महामार्गच व्यापून टाकला होता.