सातारा : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अखेर खा. श्री. छ. उदयनराजे भोसले आणि त्यांचे बंधू बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सोमवारी आपल्यातील मनोमिलन अभेद्य असल्याचे पुन्हा दाखवून दिले. काल शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी माध्यमांशी बोलल्यानंतर सातारा नगरपालिका निवडणूक भाजप आणि दोन्ही राजांच्या आघाड्या एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे दोन्हीही राजांच्या कार्यकर्त्यांमध्ये 'मन मे फुटे लड्डू अशी अवस्था पाहायला मिळाली.
जिल्ह्यातील सातारा, फलटण, कराड, महाबळेश्वर, पाचगणी, वाई, रहिमतपूर, म्हसवड आणि मलकापूर या ९ नगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आल्यानंतर जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांमध्ये उलथापालथ सुरू झाली होती. सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीत नगरसेवकांच्या ५० जागांसाठी तसेच नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपकडून घेण्यात आलेल्या मुलाखतींना प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. ५० नगरसेवक पदासाठी ५०० पेक्षा अधिक इच्छुकांनी तर एका नगराध्यक्ष पदासाठी २५ पेक्षा अधिक इच्छुकांनी मुलाखती दिल्या होत्या. या निवडणुकीसाठी उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडी आणि नगर विकास आघाडी यांच्यामध्ये मनोमिलन होणार की नाही याबाबत उत्सुकता लागून राहिली होती. उदयनराजे भोसले यांच्याकडून मनोमिलनाचे संकेत दिले होते मात्र त्यावर शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कोणतेही भाष्य केले नव्हते.
सातारा जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने शनिवारी सातारा येथे भाजप कोअर कमिटीची बैठक झाली होती. बैठकीमध्ये जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुकीबाबत नियोजन करण्यात आले होते. या बैठकीत सातारा नगरपालिकेतील मनोमिलनाबाबत निर्णय होईल अशी आशा होती मात्र त्याबाबत कोणताही निर्णय झाला नव्हता. सातारा नगरपालिकेमध्ये सहा नगरसेवक भाजपच्या चिन्हावर निवडून आले होते. त्यामुळे भाजपच्या निष्ठवंतांना या निवडणुकीत संधी दिली जावी अशी मागणी होत होती.
खा. श्री. छ. उदयनराजे भोसले आणि त्यांचे बंधू बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात काही वर्षांपूर्वी झालेला टोकाचा संघर्ष आणि त्यानंतर दोघांचे झालेले मनोमिलन यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात राजधानी सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागून राहिले होते मात्र त्याबाबत कोणताही निर्णय होत नसतानाच मुलाखतींचा आढावा घेतल्यानंतर शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दोन्ही राजांच्या मनोमिलनाबाबत संकेत दिले, मी आणि उदयनराजे भाजप म्हणून एकत्र निवडणुका लढणार आहोत. यामध्ये आमच्या दोघांची कोठेही वेगळी भूमिका नाही असे त्यांनी स्पष्ट केल्यानंतर सातारा नगरपालिकेची निवडणूक भाजप आणि सातारा विकास आघाडी आणि नगर विकास आघाड्या एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे सातारकरांची अवस्था 'मन मे फुटे लड्डू' अशी पाहायला मिळाली.
महाविकास आघाडीला चांगली संधी
सातारा नगरपालिकेसाठी निवडणूक लढवणाऱ्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणावर आहे. त्यात दोन्हीही राजेंचे मनोमिलन अभेद्य राहिल्यामुळे अनेकांना उमेदवारीच्या संधीपासून मुकावे लागणार आहे. ज्यांना संधी मिळणार नाही त्यांची भूमिका काय राहील? याबाबत चाचपणी करण्यात येत असून ज्यांनी या निवडणुकीसाठी तयारी करून ठेवली आहे त्यांनी मनोमिलनात संधी न मिळाल्यास महाविकास आघाडीची वाट धरण्याचा निर्णय घेतला असल्याचे वृत्त आहे.