कारला अचानक भीषण आग

नवरा-नवरीसह; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव

by Team Satara Today | published on : 01 May 2025


खरगोन : मध्य प्रदेशातील खरगोनमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. लग्न समारंभातून परतणाऱ्या एका कारला अचानक भीषण आग लागली, त्यानंतर नवरा-नवरीसह सात जणांनी कारमधून उड्या मारून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. खंडवा-वडोदरा राष्ट्रीय महामार्गावर जैतापूर पोलीस स्टेशन हद्दीतील गोपालपुरा गावाजवळ ही घटना घडली.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडली, जेव्हा एका एर्टिगा कारचा टायर फुटल्यानंतर कारला भीषण आग लागली. अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने झालेल्या लग्नानंतर कारमधील लोक लोणारा गावातून बामनाला गावात परतत होते. गाडी गोपाळपुरा येथे पोहोचताच, गाडीचा टायर जोरात फुटला आणि काही क्षणातच गाडीतून धूर येऊ लागला.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन, वधू-वर आणि इतर प्रवाशांनी ताबडतोब रस्त्याच्या कडेला गाडी थांबवली आणि सर्वांनी आपला जीव वाचवण्यासाठी लगेच बाहेर उड्या मारल्या. काही मिनिटांतच गाडीतील आगीने भयानक रूप धारण केलं. आगीच्या ज्वाळा इतक्या भयानक होत्या की त्या अनेक किलोमीटर अंतरावरून दिसत होत्या. स्फोटाच्या भीतीने राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या अनेक वाहनचालकांनी त्यांची वाहनं दोन किलोमीटर अंतरावर थांबवली.

स्थानिक लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली आणि आग आटोक्यात आणली, परंतु तोपर्यंत गाडी पूर्णपणे जळून खाक झाली होती. अपघाताच्या वेळी महामार्गावर एकच गोंधळ उडाला होता आणि घटनास्थळी मोठ्या संख्येने लोक जमले होते. जैतापूर पोलीस ठाण्याचे कर्मचारीही तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
बीड दौऱ्यावर जरांगे पाटलांना भोवळ आल्याने रुग्णालयात दाखल
पुढील बातमी
वाहतूक पोलिसाला युवकाकडून मारहाण

संबंधित बातम्या