सातारा : राजधानी साताऱ्यात तब्बल ३२ वर्षानंतर जानेवारी २०२६ मध्ये ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. मसाप शाहूपुरी शाखा, मावळा फौंडेशनच्या वतीने हे संमेलन होणार असून त्याची जोरदार तयारी सुरु आहे. साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी ग्रंथदिंडी व शोभायात्रा समितीचे गठण करण्यात आले आहे. ९९ व्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष मंत्री श्री.छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी ही समिती गठीत केली आहे. साताऱ्याच्या लौकिकाला साजेसी अशी ग्रंथदिंडी व शोभायात्रा होण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांना या समितीत संधी देण्यात आल्याची माहिती ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी दिली.
साताऱ्यात मसाप शाहूुपुरी शाखेच्या १२ वर्षाच्या पाठपुराव्यानंतर जानेवारी २०२६ मध्ये ९९ वे संमेलन साताऱ्यात होणार आहे. तब्बल ३२ वर्षांनी होणाऱ्या या संमेलनामुळे सातारा जिल्हावासियांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. संमेलनाच्या तयारीने वेग घेतला असून विविध संस्थासमवेत बैठकाही झाल्या आहेत. संमेलनाचे नियोजन नेटके आणि वैशिष्टयपूर्ण व्हावे यासाठी विविध समित्या तयार करण्याचे काम सुरु आहे. नुकतेच मार्गदर्शन समिती, स्मरणिका संपादन समिती जाहीर करण्यात आली आहे. आता ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ग्रंथदिंडी व शोभायात्रा समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचे मुख्य समन्वयक दत्तात्रय मोहिते हे असून विनोद कुलकर्णी, नंदकुमार सावंत मार्गदर्शक आहेत. समितीच्या सदस्यांमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग असून यामध्ये रविंद्र खंदारे, सन्मती देशमाने, अनंत जोशी, राजकुमार निकम, ॲड. अनिरुध्द जोशी, राजेश भोसले, किरण कदम, उमेश पाटील, राजू गोडसे, सचिन सावंत यांचा समावेश आहे.