मुंबई : महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आता एक नवीनच ट्विस्ट आहे. काल ५ वाजता प्रचाराच्या तोफा थंडावल्या खऱ्या, पण निवडणूक आयोगाने रात्रीतून एक पत्रक काढलं आणि "उमेदवार वैयक्तिक भेटीगाठी घेऊ शकतात" असं सांगितलं. यावरून सध्या चांगलाच राडा झालाय. या सगळ्या गोंधळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला चांगलंच धारेवर धरलंय. निमित्त ठरलंय ते 'पाडू' मशीन
निवडणूक आयोग या वेळी मतदानासाठी 'पाडू' नावाचं एक नवीन मशीन वापरणार आहे. यावरून राज साहेबांचा पारा चढलाय. त्यांनी थेट सवाल केलाय की, "हे 'पाडू' मशीन नेमकं काय भानगड आहे? हे नवीन मशीन का आणलंय? आणि जर आणलंच होतं, तर आम्हाला आधी का दाखवलं नाही?"
एकीकडे प्रचाराची वेळ संपल्यावर भेटीगाठींची मुभा आणि दुसरीकडे हे नवीन 'पाडू' मशीन.. यामुळे संशय वाढला असून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आयोगाच्या कारभारावर सडकून टीका केली आहे. आता हे 'पाडू' मशीन मतदानात काय 'जादू' करणार की गोंधळ घालणार, याकडे मात्र सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.