सातारा : सातारा पालिकेत कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा चुलबंद आंदोलनाची दखल नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी बुधवारी घेतली कामगारांचे थकीत देणे तात्काळ देऊन संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचे आदेश नगराध्यक्षांनी दिल्याची माहिती रिपाइं रोजगार आघाडीचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघमारे यांनी दिली.
या आंदोलनामध्ये अजय पुलावडे, तुषार बोकेफोडे, आरती वाघमारे, संतोष आवळे, मीना साठे, पूनम खवळे, शुभांगी वायदंडे, विजया केंदळे, सुनीता कांबळे, सुमित्रा तुपे, नलिनी देडगे, निशा कांबळे, छाया भोसले, रेखा भोसले, इत्यादी प्रतिनिधी सहभागी झाले होते.
सातारा पालिकेतील सुमारे 70 ते 80 कंत्राटी कामगारांच्या मासिक वेतनाचा प्रश्न गंभीर झाला होता. त्या संदर्भाने गणेश वाघमारे यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा करत या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर चुल बंद आंदोलन छेडले होते. तब्बल सात दिवस सुरू असलेल्या या आंदोलनाच्या निमित्ताने पालिका प्रशासनाचे मुख्य अधिकारी अभिजीत बापट यांनी घटनास्थळावर येऊन आंदोलकांशी चर्चा केली. तसेच आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन नगराध्यक्ष अमोल मोहिते यांना सुद्धा सादर केले.
या आंदोलनाबाबत बोलताना गणेश वाघमारे म्हणाले, कामगारांची थकीत देणे तत्काळ देण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली असून पगार थकवणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादी टाकण्याच्या सूचना नगराध्यक्षांनी दिलेले आहेत. ठेक्यावर असलेल्या कामगार त्यांचा मासिक पगार आणि पीएफ देण्याची जबाबदारी आणि त्या संदर्भात ठेकेदाराला समज देण्याबाबत त नगरपालिकेकडून योग्य ती कार्यवाही केली जाईल.
रयत क्रांती जनरल कामगार संघटना महाराष्ट्राचे प्रमुख गणेश वाघमारे यांनी या प्रश्नाला वाचा फोडत ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. हे आंदोलन मागण्या मान्य झाल्या म्हणून स्थगित होत नाही तर यापुढे असे झाले तर पुन्हा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.