अधिवेशनामध्ये कायदा करा, अन्यथा जनतेचा उद्रेक

महापुरुषांबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यावर उदयनराजे यांनी सत्ताधार्‍यांसह विरोधकांना फटकारले

by Team Satara Today | published on : 07 March 2025


सातारा : राज्य शासनाचे सध्या अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनामध्ये वादग्रस्त वक्तव्याबाबत आरोप-प्रत्यारोपाचा गदारोळ सुरू आहे. मात्र महापुरुषांवर वादग्रस्त वक्तव्य करणार्‍यांच्या संदर्भात कठोर कारवाई करणारे विधेयक राज्य शासन आणि विरोधकांनी एकमतीने संमत करावे. अन्यथा त्यांना जनतेच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल. जे प्रतिनिधी छत्रपती शिवरायांचे नाव घेतात त्यांनी जर हा कायदा संमत केला नाही तर त्यांचे शिवप्रेम बेगडी आहे, त्यांना युगपुरुषांचे नाव घेण्याचा अधिकार नाही, या शब्दांमध्ये खासदार उदयनराजे भोसले यांनी सर्व लोकप्रतिनिधींना फटकारले.

येथील जलमंदिर या निवासस्थानी खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महापुरुषांच्या वक्तव्या संदर्भात राज्य शासनाने तत्काळ कायदा करावा याविषयी रोखठोक विचार व्यक्त केले. ते पुढे म्हणाले, छत्रपती शिवरायांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी लोक कल्याणाचा आणि लोकसहभाग असणार्‍या स्वराज्याचा विचार मांडला होता. त्यामुळेच आजच्या लोकशाहीमध्ये आपण मुक्तपणे संचार करत आहोत. मात्र आजकाल कोणीही उठते आणि महापुरुषांच्या नावाने सवंग प्रसिद्धीसाठी वादग्रस्त वक्तव्य करतोय. अशा प्रवृत्ती या निंदनीय आहेत. राज्य शासन, त्यातले सत्ताधारी आणि विरोधक यांनी एकमताने यंदाच्या अधिवेशनामध्येच महापुरुषांच्या संदर्भातील वादग्रस्त वक्तव्यांना प्रतिबंध करणारा कायदा संमत करावा आणि आपले शिवप्रेम हे खरे आहे हे जनतेला दाखवून द्यावे. अन्यथा लोकप्रतिनिधींना छत्रपती शिवरायांचे नाव घेण्याचा अजिबात अधिकार नाही. त्यांचे प्रेम बेगडी आहे, असे आम्ही समजू. हा कायदा त्यांनी जर केला नाही तर महाराष्ट्राची जनता त्यांना कधी माफ करणार नाही. राज्य शासनाला एका मोठ्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

महापुरुषांच्या कठोर कायद्यासंदर्भात बोलताना उदयनराजे पुढे म्हणाले, यासंदर्भातील खटले फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावेत, या खटल्याचा तपास उपअधीक्षक दर्जाचा अधिकारी करेल, हा कायदा अजामीनपात्र तसेच दहा वर्षाची शिक्षा आणि जास्तीत जास्त आर्थिक दंड करणारा असेल. जे लोकप्रतिनिधी असे महापुरुषांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य करतील त्यांना तात्काळ अपात्र केले जावे, अशी कठोर कलमे त्या कायद्यात असावी, अशी मागणी उदयनराजे यांनी केली. महापुरुषांवर टीका करणार्‍या व्यक्ती एका विशिष्ट विचारधारेशी संबंधित आहेत. त्याकडे आपण कसे बघता, असे उदयनराजे विचारले असता ते म्हणाले, वादग्रस्त वक्तव्य करणारे हे सवंग प्रसिध्दीसाठी अशी वक्तव्ये करतात. ते कोणत्या धर्माचे, पक्षाचे किंवा जातीचे नसतात, ते विकृत असतात. अशा विकृत लोकांची नसबंदी झाली पाहिजे. म्हणजे अशी वाचाळ पिढी पुढे जन्माला येणार नाही, असे ते म्हणाले. तसेच राज्य शासनाने छत्रपती शिवरायांसह राजघराण्यातील इतिहासप्रसिद्ध पुरुषांचे अधिकृत ऐतिहासिक सत्य माहिती सांगणारे शासकीय खंड प्रकाशित करावेत. जेणेकरून विकृत इतिहास मांडला जाणार नाही. तसेच पीरियॉडिक ड्रामा अथवा ऐतिहासिक चित्रपट तयार करणार्‍या दिग्दर्शकांना काल्पनिक पुस्तकांचा आधार घ्यावा लागणार नाही. सिनेमॅटिक लिबर्टी च्या नावाखाली इतिहासाचा स्वैराचार होतो. त्यामुळे इतिहास तज्ञांशी चर्चा आणि संशोधनानंतरच बंदिस्त पटकथा लिहिली जावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
फळांवर शो-शायनिंगसाठी नाही लावत स्ट्रीकर्स
पुढील बातमी
गुरुवार परज परिसरातील अतिक्रमणे हटवण्याचा पालिकेचा इशारा

संबंधित बातम्या