जिहे- कठापूरबाबत सेवागिरी मंदिरात खुली चर्चा करा- आ. शशिकांत शिंदे ; भूलथापा नको, कुणाचे किती योगदान जनताच ठरवेल

by Team Satara Today | published on : 25 November 2025


पुसेगाव :  खटाव तालुक्याला वरदान ठरणाऱ्या जिहे कठापूर उपसा सिंचन योजनेचे श्रेय माझ्यासह अनेकांचे आहे. मी जलसंपदा मंत्री असताना या योजनेच्या रखडलेल्या कामांना मोठा निधी मिळवला होता. नेर धरणाच्या वरच्या भागातील आणि खाली दरजाईपर्यंतची गावे या योजनेत घेण्याचा ठराव माझ्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात करुन सर्वेक्षणासाठी निधीही आम्ही मंजूर केला होता, मात्र कावळा बसायला आणि फांदी मोडायला अशा परिस्थितीत सध्याचे लोकप्रतिनिधी या योजनेचे सर्व श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. हिम्मत असेल तर  या योजनेसाठी योगदान देणाऱ्या सर्वांची श्री सेवागिरी मंदिरात खुली चर्चा करुन कुणी किती योगदान दिले हे जनतेला ठरवू द्यावे असे आव्हान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांनी आ. महेश शिंदे यांना दिले. 

 फडतरवाडी येथे जिहेकठापूर योजनेच्या पाण्याचे पूजन करताना ते बोलत होते. यावेळी श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त गौरव जाधव, संजय चव्हाण, वसंतराव जाधव, बाळासाहेब इंगळे, डॉ. महेश पवार, राजेंद्र कचरे, दादासाहेब मोहिते, जोतीनाना सावंत, सुखदेव रणशिंग, अमृत नलावडे, प्रदीप जाधव, धैर्यशील घाडगे, सचिन देशमुख, खटाव-बुध जिल्हा परिषद गटातील शेतकरी व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आ. शशिकांत शिंदे पुढे म्हणाले, सर्वसामान्य जनतेचा विश्वास सार्थ ठरवत गेली ३५ वर्षे समाजकारण, राजकारणात काम आलो आहे. खटाव, कोरेगावचे प्रतिनिधित्व करताना २००९ पासून येथील दुष्काळी परिस्थितीविरोधात लढाई लढलो. २०१३ च्या दुष्काळात सर्वस्व झोकून काम केले. जलसंधारणाची असंख्य कामे केली. दूरदृष्टी ठेवून पुसेगाव परिसरात एमआयडिसीचे स्वप्न पाहिले. त्यासाठी पाणीही आरक्षित केले. दुर्दैवाने आमचे सरकार गेल्यामुळे ते शक्य झाले नाही. विदर्भाचा बॅकलॉग भरुन काढण्याच्या  कारणामुळे  जिहे कठापूर योजनेची कामे निधी नसल्याने ठप्प होती. मी मंत्री झाल्यावर या योजनेला मोठा निधी मिळवला. त्या वेळी काहींचा राजकीय जन्मही झाला नव्हता. आत्ताच्या आमदारांनी एमआयडिसीसाठी प्रयत्न न करता गावागावात भांडणे लावली आहेत. पैसा, सत्ता, मस्ती गरीबांना त्रास देत आहे. आता उठाव झाला नाही तर सर्वसामान्यांचे अवघड होणार आहे. नेर धरणात जिहेकठापूर योजनेचे किती पाणी येणार आहे? त्याचे वाटप कसे होणार आहे ? याचा लेखाजोखा सर्वांसमोर मांडला गेला पाहिजे. या योजनेत माझे एकट्याचे नव्हे तर सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, आजी माजी सैनिक संघटना, विविध संघटनांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते अशा अनेकांचे श्रेय आहे. मात्र सर्व काही मीच केले अशा आविर्भावात इतरांची प्रतारणा केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. 

राजेंद्र घाटगे, माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य सागर साळुंखे, वडूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य गणेश जाधव यांनी मनोगत व्यक्त करताना आ. महेश शिंदेंच्या कार्यपद्धतीचा समाचार घेतला. स्वागत व प्रास्ताविक ज्ञानेश्वर जगताप यांनी केले. आभार रवींद्र चव्हाण यांनी मानले.

यंत्रणांचा गैरवापर सुरु आहे ....

सध्या सत्ताधाऱ्यांकडून हुकुमशाहीप्रमाणे यंत्रणांचा गैरवापर सुरु आहे. लोकांच्या नरड्यावर पाय ठेवून राजकारण केले जात आहे. मतदारसंघात ठेकेदारी आणि कमिशनखोरी बोकाळली आहे. लोकांचा निवडणूकांवरील विश्वास उडाला आहे. आजही अधिकाऱ्यांवर जलपूजनासाठी  पाणी सुरु ठेवू नका म्हणून दबाव टाकला गेला असेही आ. शशिकांत शिंदे यांनी सांगितले.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यात वीज चोरीप्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा
पुढील बातमी
निवडून तर आम्हीच येणार......; साताऱ्यात दोन्ही राजांच्या निष्ठावंत अपक्ष उमेदवारांची निकराची झुंज

संबंधित बातम्या