सातार्‍यासह जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी; माण, खटाव, फलटण भागात पावसाने जनजीवन विस्कळीत

by Team Satara Today | published on : 27 September 2025


सातारा : सातार्‍यासह जिल्ह्यात शनिवारी  सकाळपासून  पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. सातारा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापूर्वी पावसाने पुर्णत: उघडीप दिली होती. मात्र माण, खटाव, फलटण या भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. 

सातारा शहर व परिसरातील बाजारपेठेत विक्रेत्यांची तारांबळ उडाली. खरीप हंगामातील काढणीस आलेल्या कडधान्यासह अन्य पिकांना पावसामुळे धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, हवामान विभागाने29 सप्टेंबरअखेर सातारा जिल्ह्यातील घाट क्षेत्रास ऑरेंज अलर्ट दिला आहे. सातारा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापूर्वी पावसाने पुर्णत: उघडीप दिली होती. मात्र माण, खटाव, फलटण या भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. शुक्रवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. मात्र दुपारच्या सुमारास पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. सुमारे तासभर पावसाने दाणादाण उडवून दिली. त्यामुळे रस्त्यावरुन पाण्याचे लोटच्या लोट वाहत होते. सातारा शहर व परिसरातील बाजारपेठेत उघड्यावर विक्रीसाठी बसलेल्या व्यापारी, व्यावसायिक व नागरिकांची अचानक आलेल्या पावसामुळे तारांबळ उडाली.

सध्या खरीप हंगामातील कडधान्य पिकांसह घेवडा, सोयाबीन पिकांची काढणी सुरू आहे. मात्र आलेल्या पावसामुळे ही पिके भिजली असल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. तर काही ठिकाणी रब्बी हंगामासाठी शेतातील मशागती सुरु असून काही ठिकाणी बाजरी, कांदा व अन्य पिकांची पेरणी सुरु असल्याचे चित्र जिल्ह्यात ठिकठिकाणी पहावयास मिळत आहे. हवामान विभागाने दि. 27 ते 29 सप्टेंबरअखेर सातारा जिल्ह्यातील घाट क्षेत्रास ऑरेंज अलर्ट दिला आहे.

दरम्यान, पावसामुळे दुपारी 12.30 वाजल्यापासून वीर धरणातून निरा नदीच्या पात्रात सुरू असलेल्या विसर्गामध्ये वाढ करून 1 हजार 425 क्युसेक करण्यात आला आहे. त्यामुळे निरा नदीच्या दोन्ही तिरावरील नागरिकांनी सावधानता बाळगावी. पाण्याची आवक व पावसाचे प्रमाण लक्षात घेता नदीपात्रातील विसर्गात कमी जास्त वाढ करण्यात येणार आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
श्री. छ. प्रतापसिंह महाराज (थोरले) नगर वाचनालयात ज्येष्ठ साहित्यिक एस. एल. भैरप्पा यांना श्रद्धांजली
पुढील बातमी
वडूथ, वाढे पुलावर भर पावसात खड्डे भरण्यास सुरुवात

संबंधित बातम्या