सातारा : सातारा पालिकेच्या निवडणुकीला दोन्ही राजे मनोमिलन पॅटर्ननुसार लढत आहेत. त्यांच्या या मनोमिलन पॅटर्नला बहुतांशी ठिकाणी बंडखोरांनी आव्हान दिले आहे. या बंडखोरांमुळे अनेक प्रभागांतील लढतीत पेच निर्माण झाला असून, या पेचात कोण बाजी मारतो, याकडे सातारकरांचे लक्ष लागून राहिले आहे. निवडणुकीनंतर दोन्ही राजांच्या पालिकेतील सत्ताबळाचे गणित प्रबळ बंडखोरांवर अवलंबून राहण्याची चिन्हे आहेत.
सातारा पालिकेच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होईल अपेक्षा होती. त्यानुसार भाजपने नगराध्यक्षासह ५०, तर महाविकास आघाडीने नगराध्यक्षासह ४५ ठिकाणी उमेदवार दिले. मात्र, मनोमिलनाच्या माध्यमातून उमेदवार निश्चित करताना इच्छुकांचे समाधान करण्यात दोन्ही राजांना अपयश आले. त्यामुळे सद्यस्थितीत पालिकेच्या २५ पैकी २४ प्रभागांत दोन्ही राजांपुढे त्यांच्या कार्यकर्त्यांचे बंडखोरीचे आव्हान उभे राहिले आहे.
प्रभाग क्रमांक एकमध्ये शिवेंद्रसिंहराजेंचे नेतृत्व मानणाऱ्या भाजपच्या प्रतीक मोहिते आणि उदयनराजे गटाचे बंडखोर शंकर किर्दत, प्रभाग क्रमांक पाचमध्ये शिवेंद्रसिंहराजे गटाचे विजय देसाई आणि उदयनराजे गटाचे बंडखोर राम हादगे, प्रभाग सहामध्ये उदयनराजे गटाचे बबन इंदलकर आणि शिवेंद्रसिंहराजे गटाचे बंडखोर अतुल चव्हाण, प्रभाग सातमध्ये उदयनराजे गटाचे मनोज शेंडे आणि शिवेंद्रसिंहराजे गटाचे बंडखोर आनंदा शेंडे, प्रभाग आठमध्ये शिवेंद्रसिंहराजे गटाचे विकास देशमुख आणि उदयनराजे गटाचे सुधाकर यादव यांच्यात समोरासमोर लढत होत आहे.
प्रभाग क्रमांक नऊमध्ये शिवेंद्रसिंहराजे गटाचे अक्षय जाधव आणि उदयनराजे गटाचे बंडखोर संजय पाटील, प्रभाग १२ मध्ये उदयनराजे गटाच्या भारती शिंदे आणि त्याच गटाच्या अश्विनी पुजारी, अपक्ष अंजली घाडगे, प्रभाग १३ मध्ये उदयनराजे गटाच्या स्नेहल तपासे आणि त्याच गटाच्या सावित्री बडेकर, प्रभाग १४ मध्ये उदयनराजे गटाच्या स्मिता घोडके आणि त्याच गटाच्या दिनाज शेख यांच्यातील लढत लक्षवेधी ठरणार आहे.
प्रभाग क्रमांक १५ मध्ये उदयनराजे गटाच्या मोनिका घोरपडे आणि शिवसेनेच्या मीनाक्षी मोरे, प्रभाग १६ मध्ये उदयनराजे गटाच्या ॲड. डी. जी. बनकर आणि शिवेंद्रसिंहराजे गटाचे बंडखोर अमित महिपाल, प्रभाग १८ मध्ये शिवेंद्रसिंहराजे गटाच्या अनिता फरांदे आणि त्याच गटाच्या किशोरी साळुंखे, शिवेंद्रसिहराजे गटाचे शेखर मोरे आणि उदयनराजे गटाचे बंडखोर विनोद मोरे, प्रभाग २० मध्ये शिवेंद्रसिंहराजे गटाचे संतोष पवार आणि उदयनराजे गटाचे बंडखोर प्रशांत आहेरराव, प्रभाग २१ मध्ये शिवेंद्रसिंहराजे गटाचे अशोक मोने आणि उदयनराजे गटाचे बंडखोर सागर पावसे यांच्यात, तर उदयनराजे गटाच्या सुजाता राजेमहाडिक आणि त्याच गटाच्या नेहा खैर यांनी आव्हान उभे केले आहे.
प्रभाग 22 मध्ये शिवेंद्रसिंहराजे गटाचे धनंजय जांभळे आणि उदयनराजे गटाचे बंडखोर गौरव इमडे, प्रभाग 23 मध्ये उदयनराजे गटाचे अशोक शेडगे आणि शिवेंद्रसिंहराजे गटाचे बंडखोर जयराम काळे, उदयनराजे गटाच्या मुक्ता लेवे आणि शिवेंद्रसिंहराजे गटाच्या वेदवती लेवे, प्रभाग 24 मध्ये उदयनराजे गटाच्या भाजप उमेदवार शुभांगी काटवटे आणि त्याच गटाच्या बंडखोर कल्पना चौगुले यांच्यातील लढती लक्षवेधी ठरणार आहेत.
या प्रभागात उमेदवारी देताना दोन्ही 'राजें'कडून नवख्यांना संधी देण्यात आल्याने निवडणुकीची गेली चार वर्षे तयारी करणाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली होती. ही नाराजीच नंतर अपक्ष आणि बंडखोरीच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उतरली असून, त्यात अनेक वर्षे राजकारणात सक्रिय असणाऱ्या आणि दोन्ही नेत्यांचे गट सांभाळणाऱ्यांचा समावेश आहे. यापैकी अनेक जणांचे समर्थक विजयाचा दावा करत आहेत. या दाव्यांवर निवडणुकीनंतर पालिकेत जाणाऱ्या दोन्ही राजांच्या गटाच्या संख्याबळाचे गणित अवलंबून राहणार आहे.