सातारा : समाजकल्याण, सांस्कृतिक कार्य व क्रीडा विभागाने अस्पृश्यता निवारण्याचा योजनेचा एक भाग म्हणुन आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्याची योजना राबविण्यात येते. ही योजना अनुसुचित जाती, जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती यापैकी एक व्यक्ती व दुसरी व्यक्ती सवर्ण हिंदू, जैन, लिंगायत, बौध्द, शीख यांच्यातील असेल तर अशा आंतरजातीय विवाहितास लागू करण्यात आलेला आहे.
सामाजिक न्याय व सांस्कृतिक कार्य व क्रीडा विभागाच्या दि. ६ ऑगस्ट २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये सदर योजना मागासवर्गातील अनुसुचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती यामधील आंतरप्रवर्गातील आंतरजातीय विवाहितांना देखील सवलती लागू केल्या आहेत. सामाजिक न्याय व सांस्कृतिक कार्य व क्रीडा विभागाच्या दि. १ फेब्रुवारी २०१० रोजीच्या शासन निर्णयान्वये आंतरजातीय विवाहितांना रक्कम रुपये ५०,०००/- इतकी रक्क्म अर्थसहाय्य देण्यात येते. लाभार्थ्यांचे अर्जाची मुळ कागदपत्रांची छाननी करण्यात येऊन लाभार्थ्यांनी सादर केलेल्या विवाह नोंदणी दाखला, वर- वधु यांचे शाळा सोडलेचा दाखल्यावर मुळ प्रतींच्या मागील बाजूस आंतरजातीय विवाह प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आलेले आहे असा शिक्का मारण्यात येतो व लाभार्थ्यांना अनुदान वाटप करण्यात येते.
आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना अर्थसहाय्य मिळणेसाठी आवश्यक रक्कम रु. दोन कोटी ११ लाखांची शासनाकडे मागणी करण्यात आलेली होती, त्यास शासनाकडून सन २०२४-२५ मध्ये तीन टप्प्यात एकूण रक्कम रु. दोन कोटी ११ लाखांचा निधी सातारा जिल्हा परिषदेस प्राप्त झाला. सदर प्राप्त निधीमधुन एकूण ४२२ जोडप्यांना या योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे. सदर जोडप्यांना मंजूर केलेला लाभ हा शासनाच्या पीएफएमएस पोर्टलद्वारे संबंधिताच्या बँक खात्यात रक्कम वर्ग करण्यात आल्याचे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, सातारा जिल्हा परिषद, सातारा यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.