मुख्याधिकारीपद रिक्त असतानाही कोरेगाव नगरपंचायत मिळकतकर वसुलीत जिल्ह्यात प्रथम, राज्यात तृतीय क्रमांकाची कामगिरी

by Team Satara Today | published on : 09 January 2026


कोरेगाव : कोरेगाव नगरपंचायतीत कायमस्वरूपी मुख्याधिकारी पद रिक्त असतानाही लोकप्रतिनिधींच्या पुढाकारामुळे प्रशासनाची गाडी वेगात धावू लागली आहे. नगराध्यक्षा दिपाली महेश बर्गे आणि उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे यांनी सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने प्रशासकीय कामकाज गतिमान ठेवत मिळकतकर वसुलीला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. त्यातूनच डिसेंबर २०२५ अखेर नगरपंचायतीने विक्रमी १ कोटी १५ लाख रुपयांची मिळकतकर वसुली करत सातारा जिल्ह्यात प्रथम, तर राज्यात तृतीय क्रमांक पटकावला आहे.

मुख्याधिकारी विनोद जळक यांची सातारा येथे बदली झाल्यानंतर कोरेगाव नगरपंचायतीतील मुख्याधिकारी पद गेल्या काही महिन्यांपासून रिक्तच आहे. काही काळ दहिवडी येथील मुख्याधिकाऱ्यांकडे अतिरिक्त पदभार, तर पुन्हा जळक यांच्याकडे तात्पुरता पदभार देण्यात आला. मात्र सध्या पूर्णवेळ मुख्याधिकारी नसतानाही उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे यांनी दररोज सकाळी साडेदहा ते दुपारी एक या वेळेत नगरपंचायत कार्यालयात उपस्थित राहून कामकाज सुरळीत ठेवले आहे. नगरसेवक, नागरिकांच्या तक्रारी, प्रशासकीय अडचणी यावर तातडीने निर्णय घेत प्रशासन अधिक कार्यक्षम केले आहे.

या कालावधीत कृष्णा खोरे विकास महामंडळचे उपाध्यक्ष आमदार महेश शिंदे, भाजप नेत्या डॉ. प्रियाताई महेश शिंदे, डॉ. अरुणाताई बर्गे, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनील खत्री, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायतीची विविध विकासकामे प्रभावीपणे राबवली जात आहेत.

नगरपंचायतीचे दैनंदिन कामकाज, शहरवासीयांना आवश्यक नागरी सुविधा आणि आर्थिक शिस्त या त्रिसूत्रीवर भर देत उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे यांनी मिळकतकर वसुली विभाग अधिक सक्षम केला आहे. वसुली विभागासाठी स्वतंत्र व्यवस्था उभारून दररोज आढावा बैठक घेतली जात आहे. विभागप्रमुख, कार्यालय अधीक्षक व कर्मचाऱ्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांना आवश्यक सहकार्य दिले जात आहे. नगरसेवकांच्या सूचनांचा प्रत्यक्ष अंमलबजावणीवर भर दिल्याने वसुली विभागाने नगरपंचायतीच्या स्थापनेपासूनचा सर्वोत्तम टप्पा गाठला आहे.

मिळकतकर वसुली ही नगरपंचायतीच्या आर्थिक सक्षमीकरणाची किल्ली आहे. याच वसुलीच्या आधारावर राज्य शासनाकडून अनुदान व विकासनिधी उपलब्ध होतो. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत वसुली वाढली तरच शहराच्या मूलभूत विकासकामांना गती मिळू शकते, ही बाब लक्षात घेऊन नियोजनबद्ध पावले उचलण्यात आली आहेत. नागरिकांना कर भरण्यास प्रोत्साहन देण्यासाठी विशेष उपाययोजना राबवण्यात येत असून, राज्यात प्रथम क्रमांक मिळवण्याचे ध्येय असल्याचे उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे यांनी स्पष्ट केले.

जानेवारी अखेरपर्यंत मिळकतकर वसुलीत आणखी लक्षणीय वाढ करण्याचा निर्धार नगरपंचायत प्रशासनाने केला आहे. त्यासाठी दैनंदिन आढावा, कामकाजातील सुधारणा आणि पारदर्शकता यावर भर दिला जाणार आहे. मुख्याधिकारी पद रिक्त असतानाही लोकप्रतिनिधींच्या पुढाकारामुळे प्रशासनाची अनुपस्थिती जाणवू न देता कोरेगाव नगरपंचायतीचे कामकाज वेगात सुरू असून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचा ठाम विश्वास नगराध्यक्षा दिपाली महेश बर्गे व उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे यांनी व्यक्त केला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षामार्फत आरोग्य तपासणी; ७३ नागरिकांची स्वच्छेने अवयव दानाकरिता लिखित संमती
पुढील बातमी
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अंतर्गत अभिनेते भाऊ कदम यांची वरुडला भेट

संबंधित बातम्या