सातारा : सातारा जिल्ह्यामध्ये मंगळवारी मकर संक्रांतीचा सण वानवसा हळदीकुंकू तसेच तिळगुळांचे वाटप या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला. पौष प्रतिपदेचा मुहूर्त साधून यंदाच्या मुहूर्तावर महिलांनी वानवसा लुटत एकमेकींना सौभाग्याचे वाण दिले. नववर्षातील पहिला मकर संक्रातीचा सण मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात पारंपारिक पद्धतीने साजरा झाला.
अनेक महिलांनी संक्रातीच्या दिवशी हळदी कुंकवाचा समारंभ ठेवून एकमेकीला वानवसाचे पदार्थ लूटले आणि तिळगुळ घ्या गोड बोला म्हणून साजरा केला. या सणाच्या दिवशी विड्यांच्या पानाची देवघेव करण्याची प्रथा आहे. पारंपारिक पद्धतीने साताऱ्यातील यादोगोपाळ पेठेतील घाडगे विठ्ठल मंदिर, मंगळवार पेठ येथील गवई विठ्ठल मंदिर, शनिवार पेठेतील काळाराम मंदिर अशा विविध ठिकाणी महिलांनी सणासाठी मोठी गर्दी केली होती. दिवसभर संक्रांति पर्वकाळ असल्यामुळे महिलांचा उत्साह अधिकच होता. संक्रातीपासून रथसप्तमीपर्यंत घरोघरी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन केले जाते. नवविवाहित महिला व तसेच छोट्या बालकांना काळ्या रंगाचे कपडे तसेच हलव्याचे दागिने परिधान करून हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला.
सातारा जिल्ह्यातील फलटण येथील श्रीराम मंदिर, फलटण तालुक्यातील सीताबाई चा डोंगर, चाफळ येथील श्रीराम देवस्थान येथे महिलांनी वानवसा करण्यासाठी आणि पूजेसाठी गर्दी केली होती. महिलांनी देवापुढे लुटावयाचे जिन्नस ठेवून एकमेकीच्या ओटी भरून पारंपारिक पद्धतीने सण साजरा केला. मंदिरामध्ये आलेल्या सुवासिनींनी एकमेकींना हळद कुंकू लावून तिळगुळ काटेरी हलवा देत तिळगुळ घ्या गोड गोड बोला, असे म्हणत एकमेकींना सौभाग्याचे वाण दिले.