साताऱ्याच्या ऐतिहासिक 'सेंट थॉमस चर्च'मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात; उपनगराध्यक्ष ॲड. दत्ता बनकर यांच्या हस्ते ध्वजारोहण

​ब्रिटीशकालीन वास्तूत गुंजला 'जय हिंद'चा नारा; लोकशाहीच्या बळकटीसाठी ख्रिस्ती बांधवांची विशेष प्रार्थना

by Team Satara Today | published on : 26 January 2026


​सातारा : ब्रिटीश सत्तेची साक्ष देणाऱ्या आणि साताऱ्यातील पहिले ऐतिहासिक चर्च म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सदर बझार येथील 'सेंट थॉमस चर्च'मध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. साताऱ्याचे उपनगराध्यक्ष ॲड. दत्ता बनकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. ज्या ब्रिटीशांनी भारतावर राज्य केले, त्यांनीच उभारलेल्या या वास्तूत आज भारतीय तिरंगा डौलाने फडकत असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.

​आज देशभरात ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह पाहायला मिळाला. साताऱ्यातही जिल्हाधिकारी कार्यालयासह विविध संस्थांमध्ये ध्वजारोहण पार पडले. या पार्श्वभूमीवर, ऐतिहासिक वारसा लाभलेल्या सेंट थॉमस चर्चच्या प्रांगणात आयोजित सोहळ्याला विशेष महत्त्व होते. सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण झाले आणि राष्ट्रगीताचे गायन करण्यात आले.

​या सोहळ्यासाठी नगरसेवक निशांत पाटील, शंकर माळवदे, नगरसेविका भारती सोलंकी आणि ज्येष्ठ समाजसेवक फिलिप भांबळ यांची प्रमुख उपस्थिती होती. ध्वजारोहणानंतर शालेय मुलांना जिलेबी आणि मिष्ठान्न वाटप करण्यात आले. भारतीय लोकशाही अबाधित राहावी आणि देशात सुख-शांती आणि सुबत्ता नांदावी, यासाठी साताऱ्यातील ख्रिस्ती बांधवांनी चर्चमध्ये विशेष प्रार्थना केली. या कार्यक्रमाचे नेटके आयोजन दिलीप भांबळ यांनी केले होते.

​सेंट थॉमस चर्च आणि ऐतिहासिक संदर्भ

साताऱ्याच्या इतिहासात या चर्चला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ब्रिटीश राजवटीत सातारा हे पश्चिम महाराष्ट्राचे मुख्यालय मानले जात असे. ब्रिटीश आमदानीतील साताऱ्याचे पहिले जिल्हाधिकारी सर जे. एन. रोज  यांनी १८५४ मध्ये या चर्चची कोनशिला ठेवली होती. त्यानंतर काही वर्षांनी याचे बांधकाम पूर्ण झाले. एकेकाळी ब्रिटीश सत्तेचे केंद्र असलेल्या याच वास्तूत आज भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा होणे, ही सातारकरांसाठी अभिमानाची बाब ठरली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
लातूर अर्बन को-ऑप. बँकेच्या कराड, सातारा शाखांचा आजपासून शुभारंभ
पुढील बातमी
प्रजासत्ताक दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन

संबंधित बातम्या