युवकांच्या टोळीचा शाहूपुरी चौक व शुक्रवार पेठेत राडा; सात जणांवर गुन्हा

मारहाण, जबरी चोरी आणि नुकसान; घरामोरील दुचाकी कोयत्याने फोडली

by Team Satara Today | published on : 05 October 2025


सातारा : मारहाण, जबरी चोरी करून युवकाच्या गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी सात जणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रागाने बघितले,असा गैरसमज करुन युवकांच्या टोळीने शाहूपुरी चौक व शुक्रवार पेठेत अक्षरश: राडा केला. युवकाला मारहाण करत त्याच्याकडील सोन्याची चैन व कानातील बाली जबरदस्तीने चोरली. तसेच टोळक्याने घरामोरील दुचाकी कोयत्याने फोडली. राज वैराट, अजय बागल, आदित्य वाघमारे, सनी भोसले, आयुष मोहिते, सोमा आवळे, रुद्र अवघडे (सर्व रा. आकाशवाणी झोपडपट्टी, सातारा) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.

ही घटना दि. 3 ऑक्टोबर रोजी भरदुपारी 3 वाजता शाहूपुरी चौक व त्यानंतर पुन्हा रात्री 9 वाजता शुक्रवार पेठेत घडली आहे. तक्रारदार मुलगा अल्पवयीन आहे. त्याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, 3 ऑक्टोबर रोजी दुपारी शाहूपुरी चौकात तो दुचाकीवरुन निघाला होता. त्यावेळी संशयित राज याला असे वाटले की तक्रारदार मुलगा त्याच्याकडे रागाने पाहत आहेत. या कारणातून राज याने त्याच्या साथीदारासोबत तक्रारदार मुलाला बेदम मारहाण केली. 

मारहाणीत 50 हजाराची सोन्याची चैन व कानातील बाळी संशयितांनी जबरदस्तीने चोरली. यावेळी संशयितांनी कोयता दाखवून तक्रारदार मुलाला, पोलीस ठाण्यात तक्रार केली तर हातपाय मोडीन, अशी धमकी दिली. या घटनेनंतर संशयित तेथून पसार झाले. 3 ऑक्टोबर रोजीच रात्री तक्रारदार मुलगा त्याच्या शुक्रवार पेठेतील घरात जेवण करत होता. त्यावेळी पुन्हा तीच संशयित टोळी त्याच्या घरासमोर आली. संशयितांनी शिवीगाळ करत धमकवण्यास सुरुवात केली. त्यावेळी संशयितांनी कोयत्याने त्याच्या दुचाकीला टार्गेट करत त्याची मोडतोड केली. यामुळे अखेर तक्रारदार मुलाने शाहूपुरी पोलीस ठाण्यात जावून तक्रार दिली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक साबळे करीत आहेत.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वंचित बहुजन आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार : डॉ. कांताताई सावंत
पुढील बातमी
विकासनगर येथे सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा

संबंधित बातम्या