सातारा : खेड, ता.सातारा येथे भंगार दुकानात काम करणार्या दोन कामगारांमध्ये दारु पिल्यानंतर वादावादी होवून झालेल्या हाणामारीत एकाचा खून झाला.
जगन्नाथ दगडू पवार (वय 60, रा.केसरकर पेठ, सातारा) असे खून झालेल्या कामगाराचे नाव आहे. संशयित आरोपी जखमी झाल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तुकाराम वैजनाथ पवार (वय 40, सध्या रा. खेड, सातारा मूळ रा.बामणेवाडी, जि.धाराशिव) असे खूनी संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी प्रशांत नानाजी कांबळे (वय 32, रा. गडकर आळी, शाहूपुरी) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ते भंगार दुकान मालक आहेत.
ही घटना गुरुवारी मध्यरात्री घडली असून शुक्रवारी पहाटे खुनाची माहिती समोर आली. जगन्नाथ पवार व तुकाराम पवार हे भंगार दुकानात काम करत होते. तसेच तेथेच भंगार दुकानाबाहेरील शेडमध्येच स्वत: स्वयंपाक करुन राहत होते. दोघांना दारु पिण्याची सवय आहे. दिवसभर काम केल्यानंतर रात्री दोघेजण दारु पित होते. दि. 3 जून रोजी रात्री भंगार दुकान मालकाने दुकान बंद केल्यानंतर दोन्ही कामगार नेहमी प्रमाणे रात्री शेडमध्ये दारु पिण्यास बसले. त्यातूनच वादावादी होवून दोघेही जखमी झाले असतानाच चिडलेल्या तुकाराम याने जगन्नाथ पवार यांच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक टाकला. यात जगन्नाथ पवार यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.