कराड : वनवासमाची (ता. कराड) येथे सोमवारी रात्री बाराच्या सुमारास बिबट्याने जर्मन शेफर्ड जातीच्या श्वानावर हल्ला करून त्याच्या फडशा पाडला.
या घटनेमुळे वनवासमाचीसह परिसरात बिबट्याची प्रचंड दहशत पसरली असून शेतकरी व मजूर शेतामध्ये जाण्यास घाबरत आहेत. वन विभागाने बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. तळवीड, वहागाव, वनवासमाची, बेलवडे हवेली, खोडशी या परिसरात यापूर्वी अनेकदा बिबट्यांचे दर्शन झाले आहे. बिबट्याने शेतातील, शेडमधील पाळीव जनावरांवर हल्ले करून त्यांना ठार केले आहे. अनेक जनावरे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाली आहेत.
काही महिन्यापूर्वी तळबीड गावात रात्रीच्या सुमारास बिबट्या विहिरीत पडल्याची घटना घडली होती. त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असताना बिबट्याने नागरिकांवर धावून जाण्याचा प्रयत्न केला होता. बिबट्याने तिथून डोंगराकडे धूम ठोकली होती.
वनवासमाची येथे जुने गावठाण व नवीन गावठाण दरम्यान रस्त्यालगत भालदार यांची कंपनी आहे. भालदार यांनी कंपनीच्या संरक्षणाकरिता जर्मन शेफर्ड जातीचे श्वान पाळले होते. सोमवारी संध्याकाळी भालदार व त्यांचे कामगार कंपनी बंद करून घरी गेले. बाराच्या सुमारास बिबट्याने श्वानावर हल्ला करून त्याला ठार केले. सीसीटीव्ही कॅमेरेमध्ये सदरची घटना कैद झाली आहे. या घटनेमुळे वनवासमाची, वहागाव, खोडशी तळबीड, बेलवडे हवेली परिसरात बिबट्याचे वास्तव अधिरेखित झाले आहे. यामुळे परिसरात प्रचंड घबराट पसरली आहे. वन खात्याने याबाबत ठोस पावले उचलत बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
तळबीड,वहागाव,वनवासमाची या परिसरात डोंगर भाग मोठा आहे. तसेच डोंगराच्या पायथ्याशी अनेक शेतकर्यांची शेती आहे. या परिसरातील शेतकरी रात्री पिकांना पाणी देण्यासाठी जात असतात. यावेळी अनेक शेतकर्यांना तळबीड, वनवामाची , खोडशी आणि वहागाव परिसरात बिबट्यांचे दर्शन झाले आहे. त्यामुळे या परिसरात नेमके बिबटे किती आहेत, याबाबत ग्रामस्थ संभ्रमात आहेत.