सातारा तालुक्यात जि. प.,पं. स. निवडणुकीसाठी ४५ अर्ज दाखल; इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत

by Team Satara Today | published on : 21 January 2026


सातारा  : सातारा तालुका जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सध्या जोरात सुरू असून त्यामुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे. उमेदवारांच्या हालचालींना वेग आला असून इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत.

निवडणूक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार, २० जानेवारी रोजी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी १७ नामनिर्देशन अर्ज दाखल झाले, तर पंचायत समिती निवडणुकीसाठी २८ अर्ज सादर करण्यात आले. त्यामुळे एका दिवसात एकूण ४५ नामनिर्देशन अर्ज दाखल झाल्याने निवडणूक प्रक्रियेला चांगलाच वेग मिळाल्याचे चित्र आहे.

दरम्यान, निवडणूक प्रक्रियेतील पहिला टप्पा असलेल्या नामनिर्देशन अर्ज विक्रीलाही मोठा प्रतिसाद मिळत आहे. २० जानेवारी रोजी एकाच दिवशी १२३ नामनिर्देशन अर्जांची विक्री झाली आहे. आतापर्यंत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी एकूण ४६९ नामनिर्देशन अर्जांची विक्री झाल्याची नोंद निवडणूक विभागाने केली आहे.

राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांबरोबरच अपक्ष इच्छुकांनीही मोठ्या प्रमाणावर अर्ज उचलल्याने येत्या काही दिवसांत नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याचा वेग आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विविध गटांतील राजकीय समीकरणे तपासली जात असून संभाव्य लढतींबाबत चर्चांना उधाण आले आहे.


निवडणूक कार्यक्रमानुसार पुढील टप्प्यांमध्ये नामनिर्देशन अर्जांची छाननी व माघारीची प्रक्रिया पार पडणार असून त्यानंतरच अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. सातारा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील लढतींकडे सर्वसामान्य नागरिकांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
एबी फॉर्मचा सस्पेन्स ठेवत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक; अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी चित्र होणार स्पष्ट : फर्न हॉटेलवर राजकीय मांदियाळी
पुढील बातमी
पंधराव्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या संयोजन समितीच्या अध्यक्षपदी हभप डॉ. सुहास फडतरे महाराज यांची निवड

संबंधित बातम्या