सातारा : शहरात गणेशोत्सवाचा उत्साह सुरू झाला असून, मंडळांच्या गणेश मूर्तींचे आगमन होऊ लागले आहे. मात्र, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर पोलीस प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. बुधवार पेठेतील शिवतेज गणेशोत्सव मंडळाच्या आगमन मिरवणुकीत डॉल्बी आणि लेझर लाईटचा वापर केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी कारवाई केली आहे.
या कारवाईत डॉल्बी सिस्टीम आणि लेझर लाईटचे साहित्य जप्त करण्यात आले असून, जिल्ह्यातील या गणेशोत्सवातील ही पहिलीच मोठी कारवाई आहे.
सातारा शहरात कालपासून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तींचे आगमन सुरू झाले आहे. रात्री उशिरा बुधवार पेठेतील शिवतेज गणेशोत्सव मंडळाने आपल्या गणेश मूर्तीची आगमन मिरवणूक काढली होती. यावेळी मोठ्या आवाजात डॉल्बी सिस्टीम आणि डोळ्यांना त्रासदायक ठरणारे लेझर लाईट्स लावून मोठ्या दिमाखात मिरवणूक काढण्यात आली.
या मिरवणुकीची माहिती मिळताच सातारा शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर तात्काळ कारवाई केली.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, पोलीस प्रशासनाने सर्व गणेश मंडळांसोबत बैठका घेऊन ध्वनी प्रदूषणाबाबतचे नियम आणि लेझर लाईटच्या वापरावर निर्बंधांची माहिती दिली होती. डॉल्बीच्या आवाजाची डेसिबल मर्यादा ठरवून दिली होती आणि नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाईचा इशाराही दिला होता.
तरीही, शिवतेज मंडळाने या नियमावलीचे उल्लंघन केल्याने पोलिसांनी मिरवणूक थांबवून डॉल्बी सिस्टीम आणि लेझर लाईटचे साहित्य जप्त केले.