सातारा : आंतरराष्ट्रीय धावपटू नंदा जाधव स्मृती पुरस्कार नवोदित आंतरराष्ट्रीय धावपटू प्राची देवकर हिला देऊन गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती नंदा जाधव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण जाधव यांनी दिली. मानचिन्ह व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
नंदा जाधव हिचा पंचविसावा स्मृतिदिन 20 ऑक्टोबरला आहे. त्या दिवशी सकाळी नऊ वाजता संभाजीनगर येथील गणेश मंदिर हॉलमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष तुळशीराम गारळे व सचिव सुरेश साधले यांनी ही माहिती दिली. किरपे तालुका कराड येथील प्राची देवकर ही अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. तिने राष्ट्रीय शालेय स्पर्धेत 3000 मीटर व दक्षिण आशियाई मैदानी स्पर्धेत 3000 मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले आहे. दुबई येथे झालेल्या आशियाई मैदानी स्पर्धेतही प्राचीचा सहभाग होता. तसेच हॉंगकॉंग येथे होणार्या आशियाई क्रॉस कंट्री स्पर्धेतही ती सहभागी होत आहे. तिच्या या यशाबद्दल तिची समितीने पुरस्कारासाठी निवड केली आहे.
याबाबत ज्येष्ठ क्रीडा संघटक साधले म्हणाले, आंतरराष्ट्रीय धावपटू नंदा जाधव स्मृती प्रतिष्ठान 25 वर्ष रक्तदान शिबिर, नवोदित खेळाडूंचा सत्कार, आरोग्य शिबिरे, क्रीडा स्पर्धांना मदत असे उपक्रम राबवत आहे. आत्तापर्यंत 300 हून अधिक रक्तदात्यांनी नंदा जाधव हिच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमास क्रीडाप्रेमी व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.