सातारा : सातारा जिल्हा सध्या ड्रग्स माफियांच्या रडारवर आला आहे की काय, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वीच जिल्ह्यात ड्रग्स प्रकरण गाजले असतानाच आता कराड तालुक्यातील पाचूपुतेवाडीत तब्बल ५५ कोटी रुपयांचा एमडी ड्रग्सचा साठा जप्त करण्यात आल्याने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. पुणे येथील महसूल गुप्तचर संचालनालयाने शनिवारी एका पोल्ट्री शेडवर टाकलेल्या छाप्यात हा काळा धंदा उघडकीस आला आहे. या घटनेनंतर राजकीय वातावरणही तापले असून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अत्यंत शेलक्या शब्दात हल्लाबोल केला आहे.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना हर्षवर्धन सपकाळ यांनी थेट देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केले आहे. ते म्हणाले, "साताऱ्यात दुसऱ्यांदा ड्रग्स सापडणे हा योगायोग नाही. जेव्हा पहिल्यांदा साताऱ्यात ड्रग्सचा साठा सापडला होता, तेव्हा त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात अडकले होते. त्यावेळी गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी कोणतीही ठोस कारवाई केली नाही. उलट ४३ पैकी ४० बांगलादेशी नागरिकांना एकनाथ शिंदेंशी हातमिळवणी करून पळवून लावण्यात आले. जर तेव्हाच कडक कारवाई झाली असती, तर आज साताऱ्यात दुसऱ्यांदा ड्रग्स सापडले नसते."
सपकाळ यांनी आपल्या आरोपांची धार अधिक तीव्र करत धक्कादायक विधाने केली आहेत. ते म्हणाले, "आता पुन्हा ड्रग्स सापडत आहेत, याचा अर्थ एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे 'पार्टनर' आहेत. मुख्यमंत्री हे या रॅकेटचे 'आका' आहेत. देवेंद्र फडणवीस हे शांत डोक्याने 'कोल्ड ब्लडेड मर्डर' करण्याचे काम करत आहेत. बहुजन समाजाला पद्धतशीरपणे ड्रग्सच्या खाईत लोटले जात आहे."सपकाळ एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी "सभ्यता, माणुसकी आणि लोकशाही मारण्याचे काम फडणवीस करत असून, ते या संदर्भातील नथुराम गोडसे आहेत," अशी घणाघाती टीकाही केली.