सातारा : पुणे-बेंगलोर महामार्गावरील चाहूर क्षेत्राच्या हद्दीत भंगार गोडाऊनला भीषण आग लागून तब्बल दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्रकार घडला आहे. या आगीमध्ये संबंधित गोडाऊन मालकाचे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. गोडाऊनच्या पिछाडीला पडलेल्या प्लास्टिकने पेट घेतल्यामुळे ही आग पसरल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सातारा नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी पोचून ही आग आटोक्यात आणली. या आगीची झळ येथील एका ट्रकला बसल्यामुळे त्याचे मोठे नुकसान झाल्याची माहिती आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, पुणे-बेंगलोर महामार्ग नजीक पुणे बाजूला जाणाऱ्या सर्विस रोडवर राहुल कांबळे यांचे आर के इंटरप्राईजेस नावाचे भंगार गोडाऊन आहे. यामध्ये लोखंडी साहित्य, काचा, प्लास्टिक, रद्दी यांचा समावेश आहे. मंगळवारी सकाळी साडेआठच्या दरम्यान गोडाऊनच्या पाठीमागील बाजूने अचानक धुराचे लोट उठू लागले आणि बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले. यामुळे येथील परिसरातील नागरिकांची एकच धावपळ झाली. आगीने वेग पकडल्यामुळे प्लास्टिक, रद्दी तसेच गोडाऊन मधील इतर साहित्य धडाडीने पेटले. आग आटोक्याच्या बाहेर जाऊ लागल्याने परिसरातील नागरिकांनी यथाशक्ती ती विझवण्याचा प्रयत्न केला.
या घटनेची खबर तात्काळ सातारा अग्निशामक दलाला देण्यात आली. अग्निशामक दलाच्या सहा जवानांनी घटनास्थळी येऊन ही आग विझवली. सुमारे एक तास हे आग विझवण्याचे काम सुरू होते. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. गोडाऊन मालक राहुल कांबळे यांनी या दुर्घटनेत तब्बल दहा लाख रुपयाचे नुकसान झाल्याचे सांगितले. गोडाऊनच्या पाठीमागील बाजूस मोकळ्या जागेमध्ये प्लास्टिक व इतर साहित्य पडून असते. वडाच्या बाजूने घनदाट झाडी असल्यामुळे येथे रात्री उशिरा मद्यपींचा वावर मोठ्या प्रमाणावर असतो. त्यांच्याकडूनच कदाचित पेटती सिगरेट अथवा इतर तत्सम कारणामुळे ही आग लागण्याची शक्यता त्यांनी बोलून दाखवली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन महावितरण ने येथील विद्युत पुरवठा तात्काळ खंडित केला. सातारा शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती घेण्याकरता पंचनामा सुरू केला होता. रात्री उशिरापर्यंत हे काम सुरू होते.