सातारा : रिपाई स्वयंरोजगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश वाघमारे आणि त्यांच्या सहकार्यांनी शुक्रवारी सातारा पालिकेच्या प्रवेशद्वारावर श्वानांचे मुखवटे आणि छायाचित्रे झळकवून जोरदार आंदोलन केले. तब्बल तीन तास ठिय्या आणि निदर्शने करून युवा परिवर्तन आघाडीच्या सदस्यांनी सातारकरांचे लक्ष वेधून घेतले. मात्र चर्चेसाठी मुख्याधिकारी उपस्थित न झाल्याने आंदोलकांनी त्यांच्या केबिनच्या दरवाजाला मागण्यांचे निवेदन चिटकवून पुन्हा पालकमंत्र्याच्या दारासमोर येत्या आठ दिवसात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
युवा परिवर्तन आघाडी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रोजगार आघाडीचे अध्यक्ष गणेश वाघमारे आणि त्यांच्या सहकार्यांनी श्वानांची जत्रा आणि कारभारी भित्रा ही टॅगलाईन धरून सातारा पालिकेसमोर आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार सकाळी साडेदहा वाजल्यापासून सर्व आंदोलक पालिकेच्या जुन्या प्रवेशद्वारावर गोळा झाले. त्यांनी श्वान निर्बिजीकरणाच्या निविदा प्रक्रियेत झालेला घोटाळा त्यामध्ये सहभागी अधिकारी, कर्मचारी त्यांनी केलेला भ्रष्टाचार तसेच सातारकरांचे ऐन सणासुदीच्या काळामध्ये सार्वजनिक क्षेत्रामध्ये फिरणे अवघड झाले आहे, असा आरोप करत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली.
मुख्याधिकार्यांनी या सर्व प्रकरणाची चौकशी करून संबंधित व्ही केअर या संस्थेचा ठेका रद्द करून त्यांना काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी केली. वाघमारे आणि त्यांच्या सहकार्यांचे तब्बल तीन तास हे आंदोलन सुरू होते. सरते शेवटी चर्चेसाठी मुख्याधिकारीच उपस्थित न झाल्याने आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्या दालनाच्या दरवाजाला चिटकवले. उपमुख्याधिकारी अरविंद दामले यांनी वरिष्ठांशी चर्चा करून या संदर्भात निर्णय देऊ, असे आश्वासन दिले. निर्बिजीकरण मोहिमेने जर गती घेतली नाही तसेच संबंधित संस्थेचा ठेका रद्द झाला नाही तर या पुढील आंदोलन पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या दारासमोर करण्यात येईल, असा इशारा गणेश वाघमारे यांनी दिला आहे.