सातारा : तहसील कार्यालय, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नोकरी लावण्याच्या बहाण्याने तीन जणांकडून १ लाख २७ हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी एका विरोधात शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मिलिंद वामन कांबळे (रा. सैदापूर, सातारा) याने दि ५ जुलै २०२४ रोजी तहसील कार्यालयामधील कॅन्टीनमध्ये १५ हजार रुपये घेतले होते. त्यानंतर १० ऑक्टोबर २०२४ रोजी ७ हजार रुपये आणि ७ फेब्रुवारी २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर ३५ हजार रुपये घेतले होते.मनीषा महेंद्र कांबळे यांना तहसील कार्यालयातील रेकॉर्ड ऑफिसमध्ये नोकरी व त्यांच्या मुलीस जिल्हा परिषदेत क्लार्क या पदावर नोकरी लावतो यासाठी रोख रक्कम घेतली होती. तसेच फिर्यादीप्रमाणे गणेश भीमा अडागळे (रा. गेंडामाळा झोपडपट्टी,सातारा) यांना बांधकाम विभागात शिपाई म्हणून नोकरीस लावतो असे सांगून ३० हजार रुपये व सतीश शिरीष कुमार (रा. बुधवार पेठ,सातारा) यांना पंचायत समितीमध्ये क्लार्क पदावर नोकरीला लावतो असे सांगून ४० हजार रुपये विश्वास संपादन करून घेतले होते.
याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४ ) ३१६(२) प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद मनीषा महेंद्र कांबळे (वय ४५ रा. नालंदा नगर बुधवार पेठ, सातारा) यांनी शहर पोलीस ठाण्यात दि ७ जानेवारी रोजी दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार माने करत आहे.