सातारा : कृषी विभागाच्या विविध योजनांच्या प्रसार व प्रसारासह शेतकरी आणि कृषी विभाग यांच्यातील दुवा म्हणून काम करण्यासाठी कृषीच्या आत्मा विभागाकडून कृषिमित्र (शेतकरी मित्र) नियुक्त केले जातात. सातारा जिल्ह्यात आत्माच्या प्रकल्प संचालकांच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यात ८३४ कृषिमित्र नियुक्त केले गेले; परंतु निधीचे कारण पुढे करत सध्या कृषिमित्रचे काम थांबले आहे.
कृषी विभागाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, शेतकऱ्यांना मार्गदर्शन व्हावे, यासाठी कृषी विभागाच्या 'आत्मा' अंतर्गत २००८ मध्ये दोन गावांत एक याप्रमाणे कृषिमित्रांची नियुक्ती केली गेली. या कृषिमित्रांकडून उत्तम काम झाल्याने आणि त्यांच्या मागणीनुसार शासनाने त्यांना २०१२ मध्ये ५०० रुपये मानधन देण्यास प्रारंभ केला. सुमारे सहा वर्षांनंतर म्हणजेच २०१८ मध्ये त्यात आणखी ५०० रुपयांची वाढ करण्यात आली. त्यानुसार या कृषी मित्रांना वर्षाला १२ हजार रुपये असे मानधन मिळत होते. राज्य शासनाने सन २०२१ मध्ये निधीचे कारण पुढे करत कृषिमित्रांचे काम थांबवले. तेव्हापासून हे कृषिमित्र बेरोजगार झाले आहेत. आज नियुक्ती मिळेल उद्या मिळेल या आशेवर ते वाट पाहात राहिले; परंतु त्यांना अद्यापही प्रतीक्षाच करावी लागली आहे.
कृषिमित्र यांचे गेली तीन वर्षे झाली काम थांबविले गेले आहे. सर्व कृषिमित्र शेतकरी यांच्याशी निगडित कामे करीत होते; परंतु निधीची तरतूद नसल्याचे कारण देत काम थांबविले आहे. सरकारने नव्याने पुनर्नियुक्त्या द्याव्यात, अशी मागणी काही कृषिमित्रांची आहे.
कृषिमित्र हा कृषी विभाग व शेतकऱ्यांमधील दुवा असतो. पिकांवर अनेक प्रकारच्या किडी, रोग येत असतात, अशावेळी कृषिमित्र फायदेशीर ठरत असतात. मात्र, याच कृषिमित्रांची प्रदीर्घ कालावधीपासून नियुक्ती करणे हिताचे नाही. शासनाला इतर योजनांसाठी पैसा उपलब्ध असताना कृषिमित्राच्या नियुक्ती करण्याकडे लक्ष केले दिले जात नाही. पुढील काळात याविरोधात स्वाभिमानी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे.
- राजू शेळके, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना.