लग्नाच्या मंडपापूर्वी मतदान केंद्रात हजेरी; तडवळे येथील नववधू ऋतुजा खराडे यांचा लोकशाहीला मानाचा मुजरा

फलटण तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ७८ % मतदारांनी हक्क बजावला

by Team Satara Today | published on : 07 February 2026


फलटण : लग्नाचा दिवस म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि भावनिक क्षण. अशा या खास दिवशीही लोकशाहीप्रती आपली जबाबदारी विसरून न जाता तडवळे येथील चि.सौ.कां. ऋतुजा हनुमंतराव खराडे या नववधूने सर्वांसाठी आदर्श घालून दिला. विवाह सोहळ्याच्या तयारीच्या गडबडीत असतानाही तिने सर्वप्रथम मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला आणि त्यानंतरच लग्नाच्या विधींना उपस्थिती लावली.

संपूर्ण लग्नाचा पोशाख, पारंपरिक दागिने आणि मेहेंदीने सजलेल्या हातांनी नववधू मतदान केंद्रावर पोहोचली तेव्हा उपस्थित अधिकारी व मतदारांनी तिचे कौतुक केले. “लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे आहे,” हा संदेश तिच्या कृतीतून प्रभावीपणे समोर आला.

आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकदा नागरिक विविध कारणांनी मतदान टाळतात. मात्र या नववधूने स्वतःच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या समारंभाच्या दिवशीही मतदानाला प्राधान्य देत समाजासमोर एक सकारात्मक आणि जबाबदारी चे उदाहरण ठेवले आहे. तिच्या या कृतीची तडवळे पंचक्रोशीत मोठ्या प्रमाणात चर्चा होत असून, तरुण मतदारांसाठी ती प्रेरणास्थान ठरत आहे. तडवळे गावातील नागरिकांनीही तिच्या या निर्णयाचे स्वागत करत सांगितले की, अशा कृतीमुळे समाजात मतदानाबाबत जागृती वाढते आणि लोकशाही प्रक्रियेला बळकटी मिळते.

मतदान हा केवळ अधिकार नाही, तर लोकशाही टिकवण्याची सामूहिक जबाबदारी आहे. कोणताही समारंभ, काम किंवा व्यस्तता यापेक्षा देशाच्या भवितव्यासाठी दिलेले एक मत अधिक मौल्यवान असते. प्रत्येक नागरिकाने मतदान करून लोकशाही अधिक सक्षम करावी. हाच या घटनेतून मिळणारा खरा संदेश आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
हॉटेल फर्नजवळ उसाच्या ट्रॉलीला ट्रकची धडक; दोन जण जखमी
पुढील बातमी
कोरेगाव तालुक्यात उत्स्फूर्त ७०.६५ टक्के मतदान; १६ मतदान यंत्रे बदलली, किरकोळ वादावादी वगळता मतदान प्रक्रिया शांततेत

संबंधित बातम्या