सातारकरांचे आयटी पार्कचे स्वप्न होणार पूर्ण

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे ड्रोन सर्वेक्षण

by Team Satara Today | published on : 29 August 2025


सातारा : सातारा शहर परिसरातील लिंब नागेवाडी येथे आयटी पार्कसाठी तब्बल 46 हेक्टर शासकीय जागा उपलब्ध आहे. सातार्‍यामध्ये आयटी पार्क उभारण्यासाठी या जागेचे ड्रोन सर्वेक्षण शुक्रवारी सातारा औद्योगिक महामंडळाच्या वतीने करण्यात आले. त्यानुषंगाने सातारकरांचे आयटी पार्कचे स्वप्न होणार पूर्ण होणार असल्याचे दिसून येत आहे.

येथील 113 एकर शासकीय जागेचे हस्तांतरण जिल्हा प्रशासनाकडून शासकीय औद्योगिक वसाहतीकडे दिले जाणार आहे. याबाबतची शासकीय प्रक्रिया सुरू आहे. खासदार उदयनराजे भोसले व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी त्यांच्या पद्धतीने शासनाकडे पाठपुरावा करून सातार्‍यात आयटी पार्क व्हावे, याकरिता पाठपुरावा केला होता. मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे चार महिन्यापूर्वी लिंब व नागेवाडी या परिसरातील शासकीय जागेच्या संदर्भातील प्रस्ताव सादर करून तिथे सर्वेक्षण करण्याची मागणी केली होती. त्यानुसार औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकार्‍यांनी सकाळी 11 वाजता या सर्व परिसराचे  ड्रोन सर्वेक्षण केले. सुमारे दीड तास हे सर्वेक्षण सुरू होते. येथील उपलब्ध जमीन आणि या जमिनीचे गट क्रमांक तसेच जमिनीच्या हद्द निश्चिती तसेच जमिनीकडे जाणारे पर्यायी मार्ग या सर्व बाबींचा ड्रोनच्या माध्यमातून हवाई सर्वे करण्यात आला.

यासंदर्भात माहिती देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, सातार्‍यात आयटी पार्क व्हावे ही सर्व सातारकरांची इच्छा आहे. या ड्रोन सर्वे नंतर या जागे संदर्भातील अधिसूचना लवकरच जाहीर करण्यात येईल. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला होता. आयटी पार्क बरोबरच येथे कन्व्हेन्शन सेंटरचाही प्रस्ताव देण्यात आलेला आहे. या सेंटरचा उपयोग सातारकरांना विविध कार्यक्रमाकरिता होणार आहे. तसेच आयटी पार्क करिता लाईट, पाणी, पर्यायी रस्ते, तसेच इतर सुविधा देण्यासंदर्भात सूचना देण्यात आलेल्या आहेत. कन्वेंशन सेंटर आणि आयटी पार्क यांची पायाभूत सुविधांसह होणारी उभारणी सातार्‍यात तंत्रस्नेही विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे. सातारा शहर हे पुणे पासून दीड तासाच्या अंतरावर आहे. तसेच महामार्गालगतची आयटी पार्क ची जागा या दृष्टीने लिंब व नागेवाडी येथील 113 एकर जागा ही उपयुक्त असल्याचे मत शिवेंद्रसिंहराजे यांनी याप्रसंगी नोंदवले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सासूला जखमी केल्याप्रकरणी सुनेवर गुन्हा
पुढील बातमी
ऑलिम्पिकवीर पै. श्रीरंग जाधव यांचे कुस्तीतील योगदान युवा पिढीसाठी प्रेरणादायी

संबंधित बातम्या