सातारा : घटस्थापनेने नवरात्रौत्सवाला प्रारंभ झाला. घरगुती घटस्थापनेसह सार्वजनिक नवरात्र मंडळांकडून आगमन सोहळ्यांसाठी फुलांना मागणी वाढली असल्याने फुल बाजार तेजीत होता. फुलांच्या खरेदी विक्रीतून लाखोंची उलाढाल झाल्याने फुलबाजाराला झळाळी मिळाल्याचे चित्र जिल्ह्यात पहायला मिळाले.
गणेशोत्सवा पाठोपाठ येणार्या नवरात्रौत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दुर्गा देवीच्या आगमन सोहळ्यासाठी मंडळांनी ट्रॅक्टर ट्रॉलीला आकर्षक फुलांची सजावट केली होती. तसेच मंडपांमध्येही मंचकासह आरासीसाठी फुलांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याने फुलांना मागणी वाढल्याने फुलबाजार तेजीत आहे. ग्रामदेवतांची घरोघरी पूजा व घटस्थापनेसाठी देखील फुलांची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. फुलांचे रेडीमेड हार देखील मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यात आले.
त्यामुळे नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सातारा शहरात झेंडू, पांढरी व पिवळी शेवंती, अॅस्टर, जरांडा, गुलाबाची फुले व पाकळ्या, निशीगंध आदि फुलांची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. एरवी शंभर किलो फुलांची मागणी करणार्या फूल विक्रेत्यांनी चारशे ते पाचशे किलो फुले मागवली आहेत. मागणी वाढल्याने दरही वाढले आहेत. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवरर फुल बाजारात लाखों रुपयांची उलाढाल होत आहे.
स्थानिक स्तरावर येणार्या झेंडूला खरेदीमध्ये प्राधान्य दिले जात असून इतर प्रवर्गातील बहुतांश फुले ही पुणे, कोल्हापूर, पंढरपूर शहरासह कर्नाटक राज्यातून मागवण्यात आली आहेत. पावसाचा फटका बसल्याने उत्पादन मार्यादित असले तरी मागणी वाढल्याने झेेंडू 150 ते 200 रुपये किलो, शेवंती 300 ते 400, अॅस्टर 300 ते 400, साधा गुलाब 200 ते 300 रुपये, डच गुलाब 400 ते 500 रुपये, तर निशीगंध 600 ते 700 किलो दराने किरकोळ विक्री करण्यात येत आहे.
नवरात्रोत्सवात घरोघरी घटस्थापना करण्यात आली आहे. या घटाला दररोज फुलांची माळ घातली जाते. त्यासाठी कारळ्याच्या फुलांचा मान असतो. तर दुर्गा अवतारातील आंबामातेसाठी कमळाच्या फुलाला विशेष स्थान असते. त्यामुळे सातारा शहर व परिसरात ठिकठिकाणी कारळे तसेच कमळाच्या फुलांची विक्री होत आहे. मात्र यावर्षी पावसाचा फटका बसल्याने कारळाच्या फुलांची उपलब्धता कमी प्रमाणावर आहे. गजर्यासाठी अबोली, मोगर्याबरोबर कन्हेरीचाही वापर करण्यात आला असून देवींसाठी मोठ्या प्रमाणावर फुलांची खरेदी करण्यात येत आहे.