दादामहाराज चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

by Team Satara Today | published on : 08 February 2025


सातारा : स्व.दादामहाराज दिवस-रात्र, टेनिस बॉल चषक स्पर्धेच्या माध्यमातुन महाराष्ट्राला आणि देशाला नवीन खेळाडू मिळतील असा आशावाद व्यक्त करीत सातारचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आयोजकांचे नियोजन उत्कृष्ट असल्यानेच दादामहाराज चषक क्रिकेट स्पर्धा गेली 22 वर्षे सातत्याने खेळवली जात आहे असे गौरवोद्गार व्यक्त केले.

सातारचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या शुभहस्ते पोलिस अधिक्षक समीर शेख यांच्यासह विविध महसुल-प्रशासकीय अधिका-यांच्या आणि क्रीडाप्रेमींच्या उपस्थितीत श्रीमंत छत्रपती प्रतापसिंहमहाराज उर्फ दादा महाराज दिवस-रात्र टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले त्यावेळी ते औपचारिक  बोलत होते. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी संतोष पाटील पुढे म्हणाले की, दादा महाराज चषक  डे-नाईट स्पर्धेमुळे अनेक खेळाडुंना आंतरराष्ट्रीय नियमानुसार स्पर्धा खेळण्याचा मिळणारा अनुभव अतिशय महत्वाचा आहे. अश्याप्रकारच्या  सातत्यपूर्ण  स्पर्धेमधुनच उदयोन्मुख खेळाडू निर्माण होत असतात. भरघोस बक्षिसांमुळे राज्यातील संघाना या स्पर्धेत भाग घेवून आपले क्रीडाप्रेम आणि खेळाडूपणा सिध्द करण्याची संधी मिळत आहे हे निश्चितच कौतुकास्पद आहे. खेळामध्ये हार जीत महत्वाची नसते, स्पर्धेत भाग घेवून खेळाडूपणा टिकवणारा जीवनात यशस्वी होत असतो, म्हणूनच  या स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व संघातील प्रत्येक खेळाडूचे मी अभिनंदन करतो आणि त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो.

यावेळी दादा महाराज चषक क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ जिल्हाधिकारी यांनी संपूर्ण एक ओव्हर फलंदाजी करुन करण्यात आला. त्यानंतर स्पर्धेतील साखळीमधील दोन संघांमधील सामन्याला सुरुवात करण्यात आली. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी खेळलेल्या सहाही चेंडूंवर चौफेर टोलेबाजी करत, क्रिकेटसह जिल्हयावर पकड असल्याचेच भासवले. जिल्हाधिकारी यांच्या उत्स्फुर्त खेळीमुळे क्रिकेट मैदानावर वेगळाच माहौल निर्माण झाला होता. प्रारंभी उद्घाटन समारंभास उपस्थित मान्यवरांचे स्वागत आणि सत्कार उदयनराजे मित्र समुहाच्या वतीने जेष्ठ संघटक आणि क्रीडा मार्गदर्शक सुरेश साधले, माजी शिक्षण व अर्थ सभापती जि.प.सदस्य  सुनिल काटकर, माजी नगराध्यक्ष निशांत पाटील, अमोल पाटुकले, यांनी केले दरम्यान दादा महाराज चषक क्रिकेट स्पर्धा दिनांक 23 फेब्रूवारी 25 पर्यंत चालणार असून, दि.23 रोजी अंतिम सामना होणार आहे. अंतिम सामन्यानंतर खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्य हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षिस समारंभ होणार आहे.

या उद्घाटन समारंभास अतिरिक्त जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण, जिल्हापरिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजेमाने, सातारा तहसिलदार नागेश गायकवाड, जिल्हा क्रीडा अधिकारी नितिन तारळेकर, माजी शिक्षण व अर्थ सभापती जि.प.सदस्य  सुनील काटकर, निशांत पाटील, माजी उपनगराध्यक्ष राजु भोसले व मनोज शेंडे, माजी नगरसेवक धनंजय जांभळे, उदयनराजे मित्र समुहाचे जेष्ठ सदस्य शंकरराव (काका )किर्दत, शिरिष चिटणीस, संग्राम बर्गे, सातारा पंचायतसमितीचे माजी सदस्य प्रविण धसके, अमोल पाटुकले, राजाभाऊ कुंभार, डॉ.झुंजार कदम, मनोज कान्हेरे, रोहित लाड, शेखर चव्हाण, सुजित जाधव, प्रणव लेवे, अमोलदादा तांगडे, योगेश पाटील, मनिष घोरपडे, सचिन खोले यांचेसह मित्रसमुहाचे कार्यकर्ते, क्रीडाप्रेमी नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
श्री ब्रहमेंद्रस्वामी हायस्कूलने सर्वगुणसंपन्न विद्यार्थी घडवले
पुढील बातमी
जुगारप्रकरणी एकावर कारवाई

संबंधित बातम्या