महाबळेश्वर, दि. १३ : महाबळेश्वर परिसरातील तापोळा रस्त्यावर चिखली गावाच्या परिसरात खाद्याच्या शोधात असलेल्या एका माकडाने दुचाकीवर झडप घातली. यामुळे झालेल्या दुचाकीच्या अपघातात पतीचा मृत्यू झाला, तर पत्नी जखमी झाली आहे. आनंद सखाराम जाधव (वय ५०, रा. देवळी) असे अपघातात मृत्यू झालेल्या पतीचे नाव आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, आनंद जाधव हे गुरुवारी सायंकाळी महाबळेश्वर शहरातून आपली कामे उरकून पत्नीसमवेत दुचाकीवरून तापोळा रस्त्यावरून देवळी या आपल्या गावाकडे निघाले होते. तापोळा मुख्य रस्त्यावर चिखली परिसरात दुचाकीवर माकडाने झडप मारली. दुचाकीस्वाराचा ताबा सुटला व तोल जाऊन आनंद जाधव हे पत्नीसह रस्त्यावर कोसळले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
अशा जखमी अस्वस्थेत त्यांना ग्रामीण रुग्णालय महाबळेश्वर येथे उपचारांसाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातात पत्नी जखमी झाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद गुरुवारी रात्री उशिरा झाली. या घटनेची माहिती मिळताच देवळीसह परिसरातील ग्रामस्थांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती.