पुणे-सातारा महामार्गावरील भीषण अपघातात तरुणीचा मृत्यू; दुचाकीस्वार गंभीर

by Team Satara Today | published on : 12 January 2025


सातारा : पुणे-सातारा महामार्गावरील नीरा नदी पुलाजवळ शिंदेवाडी येथे झालेल्या भीषण अपघातात 24 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्दैवी घटना रविवारी घडली असून, शिरवळ पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे.

घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, पुण्यातील नामांकित आयटी कंपनीत कार्यरत तीन तरुण आणि एक तरुणी महाबळेश्वरला फिरण्यासाठी दुचाकीवरून (एमएच 01 डीजे 8365) निघाले होते. खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडी गावाजवळील नीरा नदी पुलावर भरधाव ट्रकने (पीबी 06 एयु 9995) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात रुबेल सिन्हा (वय 24) रस्त्यावर पडली आणि तिच्या शरीरावरून ट्रक गेल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. दुचाकी चालवणारा तरुण गंभीर जखमी असून, त्याच्यावर शिरवळ येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप जगताप, विलास यादव, पो. ह. अरविंद बाराळे, आणि भाऊसाहेब दिघे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी महामार्गावर झालेली वाहतूक कोंडी सुरळीत केली आणि जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

रुबेल सिन्हा हिच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तरुण वयात गमावलेल्या जीवामुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे. अपघातामुळे महामार्गावरून जाणार्‍या अवजड वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता पुन्हा एकदा समोर आली आहे.

शिरवळ पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून, ट्रक चालकाला अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच या दुर्घटनेने महामार्गावरील सुरक्षा उपायांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. पोलिसांनी वाहनचालकांना अधिक सावध राहण्याचे आणि वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन केले आहे.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा स्वाभिमान दिन शाही पद्धतीने साजरा
पुढील बातमी
धमकी दिल्या प्रकरणी दोन जणांविरोधात तक्रार

संबंधित बातम्या