सातारा जिल्ह्यात मतदानासाठी मतदान यंत्रणा सज्ज; वीस हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती, ११ हजार ८२२ मतदान यंत्रे तैनात

by Team Satara Today | published on : 04 February 2026


सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या ६५ गट आणि ११ पंचायत समितीच्या १३० गणासाठी शनिवारी दिनांक ७ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या कालावधीमध्ये मतदान होत आहे. या मतदानासाठी जिल्ह्यात ११ हजार ८२२ मतदान यंत्रे  तैनात करण्यात आले आहेत. सातारचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील २१ लाख९४ हजार ११० मतदार मतदान करणार आहेत. यासाठी वीस हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सातारा जिल्ह्यातील जावळी, पाटण, महाबळेश्वर, वाई ,कराड येथील काही अति दुर्गम व मागास भागातही मतदान यंत्रणा पोहोचवण्यासाठी हालचाली सुरू आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये आठ वर्षानंतर होणाऱ्या सातारा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात सत्ताधाऱ्यांतर्गतच तसेच विरोधी पक्षातील उमेदवारांची कसोटी लागणार आहे. बऱ्याच अपेक्षांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. स्थानिक जिरवा जिरवीच्या राजकारणामुळे काही अपक्षांनी आपले उमेदवारी अर्ज ठेवून या निवडणुकीत आपलं अस्तित्व दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे.

सातारा जिल्ह्यात अकरा लाख ८ हजार २०३ पुरुष व दहा लाख ८५ हजार८४७ महिला आणि इतर ६० मतदार नोंदणी झालेली आहे. जिल्ह्यातील २,८७७ मतदान केंद्रावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस व खाजगी वाहनाने मतदान यंत्रणा व कर्मचाऱ्यांना जाण्या येण्यासाठी सोय केली आहे. तर दुसऱ्या बाजूला परगावातील मतदारांसाठी आर्थिक दृष्ट्या सक्षम उमेदवारांनी वाहनांचे नियोजन केले आहे.

खऱ्या अर्थाने राजकीय पक्ष व उमेदवारांनी आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीच्याबाबत शासकीय काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घातले आहे. प्रस्थापित उमेदवारांच्या प्रचारा निमित्त ग्रामीण भागात जेवणावळी सुरू आहे. अद्यापही एकाही ठिकाणी कारवाई झालेली नाही. निवडणुका म्हणजे खऱ्या अर्थाने लोकशाहीचा उत्साह पूर्वी होता. आता सत्ताधाऱ्यांच्या समवेतच काही प्रशासकीय पक्षनिष्ठा व व्यक्तीनिष्ठांचा उद्रेक झालेला आहे. अनेक ठिकाणी विनापरवाना प्रचाराची वाहने हिंडत आहेत. सत्ताधाऱ्यांच्या सोबतच अनधिकृत व्यावसायिक प्रचारामध्ये उतरले आहेत . लेखी तक्रारीची गंभीर दखल घेतली नसल्याचा अनुभव आहे. याची सुद्धा उघडपणे चर्चा ग्रामीण भागात होताना दिसत आहे आहे.

सातारा जिल्ह्यात तालुका निहाय सातारा -३७१ कराड – ४८६ पाटण- ४०१ कोरेगाव२५३ – वाई- १८१ खंडाळा – ११४ महाबळेश्वर- १०९ जावळी- १५४ फलटण- २८२ माण – २१७ आणि खटाव– ३०९ अशी मतदान यंत्रणा आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना या यंत्रणेची तपासणी करूनच मतदानाला सुरुवात करावी लागणार आहे. तसेच काही ठिकाणी तक्रार असेल तर त्या तक्रारीचे तातडीने जागेवरच निरसन करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. भरारी पथकही सोबत असले तरी त्यांना सुद्धा मर्यादा येत आहेत.

या निवडणुकीमध्ये अटीतटीची लढत असल्यामुळे ग्रामीण भागात आतापासूनच मतदान पत्रिका व त्यावरील राजकीय पक्षाचे चिन्ह खुलेआम छपाई करून आणलेले आहेत. या चिन्हाबाबत आता नियमावली करणे गरजेचे बनले आहे असे जेष्ठ नागरिकांनी सांगितले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा पालिकेच्या कंत्राटी कामगारांच्या चुलबंद आंदोलनाची नगराध्यक्षांकडून दखल; थकीत देणे तात्काळ देण्याचे नगरपालिका प्रशासनाला निर्देश
पुढील बातमी
साताऱ्यात राधिका रोडवर भोसले मळा येथून दुचाकीची चोरी

संबंधित बातम्या