इलेक्ट्रिकल केबल्स निर्मात्या कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत

40 रुपयांचा शेअर पोहचला 129 रुपयांवर!

by Team Satara Today | published on : 23 November 2024


मुंबई : गेल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराने तुफान तेजी नोंदवली आहे. बाजाराच्या या तेजीत इलेक्ट्रिकल केबल्स निर्मात्या कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत होते. ही कंपनी म्हणजेच डिव्हाईन पॉवर एनर्जी लिमिटेड (डीपीईएल) होय. कंपनीने शुक्रवारी (ता.२३) सांगितले आहे की, त्यांनी विमलेश इंडस्ट्रीजसोबत कंपनीतील 100 टक्के भागभांडवल 70 कोटी रुपयांना विकत घेण्यासाठी शेअर खरेदी करार केला आहे.

डीपीईएलने सांगितले आहे की, या अधिग्रहणामुळे कंपनीला देशांतर्गत वीज उद्योगात आपला व्यवसाय वाढण्यास मदत होईल. डिव्हाईन पॉवर एनर्जी लिमिटेडचे शेअर्स एनएसईवर 6.5 टक्क्यांनी वाढून, 129 रुपयांच्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचले आहेत.

काय म्हटले आहे कंपनीने?

अधिग्रहणानंतर, विमलेश इंडस्ट्रीज तिच्या संपूर्ण मालकीची उपकंपनी बनेल, असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे. डिव्हाईन पॉवर एनर्जीने विमलेश इंडस्ट्रीजमधील 100 टक्के हिस्सा 70 कोटी रुपयांना विकत घेण्यासाठी शेअर खरेदी करार केला आहे. भागधारकांच्या खरेदी कराराच्या मंजूरीच्या तारखेपासून 60 दिवसांत संपादन पूर्ण केले जाईल.

फक्त 40 रुपयांवर आला आयपीओ

डिव्हाईन पॉवर एनर्जीचा आयपीओ या वर्षी जुलैमध्ये 40 रुपयांच्या किमतीत आला होता. कंपनीचे शेअर्स 155 रुपयांवर 288 टक्क्यांच्या प्रीमियमसह सूचीबद्ध झाले. आयपीओ 25 जून ते 27 जून 2024 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला होता. आयपीओची लॉट साइज 3,000 शेअर्सची होती. तीन दिवसांत आयपीओ 393.67 पट सबस्क्राइब झाला. डिव्हाईन पॉवर एनर्जी लिमिटेडचे बाजार भांडवल 269.09 कोटी आहे. त्याची 52 आठवड्यांची उच्चांकी किंमत 162.75 रुपये आणि 52 आठवड्यांची कमी किंमत 66.25 रुपये आहे. या कंपनीत प्रवर्तकांची भागिदारी 73.50 टक्के असून इतरांची भागिदारी 24.2 टक्के आहे.

2001 मध्ये स्थापन झालेली डिव्हाईन पॉवर एनर्जी लिमिटेड बेअर कॉपर/ॲल्युमिनियम वायर, बेअर कॉपर/ॲल्युमिनियम स्ट्रिप, विंडिंग कॉपर/ॲल्युमिनियम वायर आणि विंडिंग कॉपर/ॲल्युमिनियम स्ट्रिप बनवते.

(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वेब सिरीजपेक्षा खूप वेगळा आहे मिर्झापूर चित्रपट : मुन्ना भैया
पुढील बातमी
पर्थच्या कसोटीत दुसऱ्या दिवशी यशस्वी जयस्वालचा जलवा

संबंधित बातम्या