सातारा : राज्य उत्पादन शुल्क विभागाने परमिट रूमला दहा टक्के वॅट आकारणी, अनुज्ञप्ती फी मध्ये 15 टक्के वाढ आणि एक्साईज ड्युटी मध्ये दीडशे टक्के वाढ ही राज्य शासनाची करप्रणाली अन्यकारक असून त्यामुळे जिल्ह्यातील तसेच राज्यातील मद्यविक्रीचा व्यवसाय धोक्यात आलेला आहे. या कर आकारणी मध्ये लवचिक बदल करावा, अशी मागणी सातारा परवानाधारक मद्यविक्रेता सेवा संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.
मद्य विक्रेता संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात नमूद आहे की, विक्री पश्चात दहा टक्के वॅट, 15% अनुज्ञप्ती फी यामुळे परमिट व्यावसायिक अडचणीत आले आहेत. एक्साइज ड्युटी दीडशे पट वाढवण्यात आली आहे. सर्वसामान्यांना मिळणारी मद्याची बाटली पूर्वी दीडशे रुपये रुपयांना मिळत होती. ती आता या करवाढीने अडीचशे रुपयाला मिळणार आहे. एवढी वाढ सर्वसामान्य ग्राहकांना परवडणारी नाही. शासनाने विक्री पश्चात दहा टक्के वॅट पूर्ण रद्द करावा, वॅट केवळ फर्स्ट पॉइंट वरती 3% दराने करावा. म्हणजे परमिट रूम चालकावरील आर्थिक भार कमी होईल आणि व्यवसाय सुसह्य होईल. याबाबत शासनाने लवचिक धोरण स्वीकारले तर परमिट रूम चालकांना 20 टक्के नफा ठेवून व्यवसाय होऊ शकतो आणि ग्राहकांना परवडणार्या सेवा देणे शक्य होईल, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदन सादर करतेवेळी सातारा जिल्हा मद्य विक्री सेवा संघाचे अध्यक्ष बाळासाहेब बाचल, उपाध्यक्ष सचिन बेलागडे, आरती स्वामी, बबनराव शिंदे, तात्या भोसले, एम आर भोसले, नागेश जाधव, महेश धुमाळ, संजय शेडगे, महिला आघाडी अध्यक्ष सुनीता राजेघाडगे, लालूशेठ शिंगटे, सुभाष पवार, संजय शिंदे, संजय जगदाळे, तसेच कराड, पाटण, फलटण, कोरेगाव, खटाव, माण, वाई, महाबळेश्वर, सातारा तालुक्यातून अनेक पदाधिकारी उपस्थित होते.