प्रतापगड कारखान्याचा प्रतीटन एकरकमी ३३५० रुपये दर - चेअरमन यशवंत साळुंखे, संचालक मंडळाच्या सभेत निर्णय

by Team Satara Today | published on : 17 December 2025


सातारा : अजिंक्यतारा- प्रतापगड साखर उ‌द्योग संचलित प्रतापगड सहकारी साखर कारखाना सन २०२५- २६ या गळित हंगामामध्ये गाळपास येणाऱ्या ऊसाला प्रती मे.टन एकरकमी ३३५० रुपये दर देणार असल्याचा निर्णय ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत घेण्यात आला आहे, अशी माहिती अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशवंत साळुंखे यांनी दिली आहे. 

यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अजिंक्यतारा कारखान्याच्या मदतीने बंद पडलेला प्रतापगड कारखाना सुरु करण्यात आला आहे. २०२३-२४ व २०२४-२५ हे दोन्ही हंगाम ऊस पुरवठादार शेतकरी, सभासद आणि कामगारांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पाडलेले आहेत. सदर हंगामातील ऊसाचे पेमेंट वेळेत अदा केले असल्यामुळे कारखान्याने शेतकऱ्यांचा विश्वास संपादित केला आहे. दोन्ही कारखान्याचे व्यवस्थापन चालू गळीत हंगाम यशस्वीपणे पूर्ण करणेसाठी प्रयत्न करीत आहे. 

सन २०२५-२६ चा हंगाम पुर्ण क्षमतेने सुरु असून या हंगामामध्ये आता पर्यंत ४० दिवसामध्ये ८५ हजार ३४० मे. टन ऊसाचे गाळप करुन सरासरी ९.८४ टक्के साखर उत्तान्याने ८१ हजार ०५० क्विंटल साखर पोती उत्पादित केलेली आहेत. या हंगामात गाळपास येणाऱ्या उसाला प्रतिटन एकरकमी ३३५० रुपये दर देण्याचा निर्णय अजिंक्यतारा- प्रतापगड उद्योग व्यवस्थापनाने घेतला आहे. कारखान्याच्या या हंगामामध्ये ३.५० लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दीष्ठ असून ते साध्य करणेसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला संपूर्ण ऊस कारखान्यास गाळपासाठी पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन दोन्ही कारखान्याच्या व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी प्रतापगड साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे, अजिंक्यतारा कारखान्याचे व्हाईस चेअरमन नामदेव सावंत व सर्व संचालक, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते व अधिकारी उपस्थित होते.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा जिल्ह्यातील विविध शाळा व महाविद्यालयातील राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास शिबीर
पुढील बातमी
साताऱ्याचा उपनगराध्यक्ष कोण होणार? ; नागरिकांची उत्सुकता शिगेला

संबंधित बातम्या