पुसेगाव : श्री सेवागिरी महाराज यांच्या यात्रेनिमित्त जातिवंत खिलार जनावरांचे भव्य प्रदर्शन मोठ्या उत्साहात पार पडले. राज्यातील खिलारप्रेमींनी हजारोंच्या संख्येने उपस्थिती दर्शिवली, तर या प्रदर्शनात आठ जिल्ह्यातून ३५१ देखणी जनावरे सहभागी झाली.
या स्पर्धेत सांगोला (सोलापूर) येथील हणमंत शिवलिंग सुरवसे यांची 'राधा' ही जुळीक गाय काजळी गटात तर नवलेवाडी (ता. खटाव) येथील जमीर फरीद शेख यांची दोन दाती 'चिमी' ही गाय कोसा गटात चॅम्पियन ठरली. आंबे (ता. पंढरपूर) येथील परमेश्वर धर्मा गायकवाड यांचा 'सुंदर' हा जुळीक बैल काजळी गटात तर शेडगेवाडी (ता. सातारा) येथील सुजय गायकवाड यांचा 'बैजा' हा जुळीक बैल कोसा गटात चॅम्पियन ठरला. चारही चॅम्पियन जनावरांच्या मालकांना प्रत्येकी २५ हजार रुपये व श्री सेवागिरी चषक देण्यात आला.
या प्रदर्शनात खिलार काजळी बैल गट, खिलार काजळी गाय गट, खिलार कोसा बैल गट, खिलार कोसा गाय गट या चार मुख्य गटांत ही स्पर्धा झाली. जुळीक, सहा दाती, चार दाती, दोन दाती, आदत (वर्षांवरील), आदत (वर्षाखालील) अशा उपगटांत एकूण ३५१ जनावरांनी सहभाग घेतला. पंच म्हणून स्थानिक पंच कमिटी आणि पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांनी काम पाहिले. प्रत्येक उपगटातील प्रथम चार क्रमांकाच्या विजेत्या जनावरांच्या मालकांना अनुक्रमे ७ हजार, ५ हजार, ३ हजार, २ हजार रुपये रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
स्पर्धेचा बक्षीस समारंभ मठाधिपती महंत सुंदरगिरी महाराज, ट्रस्टचे अध्यक्ष संतोष वाघ, विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, रणधीर जाधव, संतोष उर्फ बाळासाहेब जाधव, सचिन देशमुख, गौरव जाधव, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. डी. पी. लोखंडे, स्थानिक कमिटी सदस्य आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. देशी गोवंशाचे जतन (गो-संगोपन), संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी ट्रस्ट दरवर्षी हे प्रदर्शन भरवून शेतकऱ्यांना प्रोत्साहित करते. प्रदर्शनात सहभागी झालेली जातिवंत खिलार जनावरे पाहण्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक राज्याच्या अनेक भागांतून शेतकरी तसेच खिलारप्रेमींनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.