सातारा : शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी तीन जणांना दोन वर्षे कारावासासह दंडाची शिक्षा कराड न्यायालयाने ठोठावली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 ऑक्टोबर 2017 रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कराड शहरातील भेदा चौक परिसरात विजय दिनकर संदे (वय 42), सचिन दिनकर संदे (वय 30), अभय दिनकर संदे (वय 34 सर्व रा. वडगांव हवेली, ता. कराड) हे एकमेकांना काठ्यांनी मारहाण करत होते. त्यावेळी कराड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल सतीश गंगाधर जाधव व त्यांचे सहकारी संबंधितांना भांडण करू नका, इथून निघून जा, असे सांगत असताना संबंधितांनी जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांना धक्काबुक्की करून मारहाण करीत शासकीय कामात अडथळा आणला होता. याबाबतचा गुन्हा पोलीस हेड कॉन्स्टेबल सतीश जाधव यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात दाखल केला होता.
या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक एस. व्ही. खाडे यांनी केला. तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. एस. कापसे यांनी न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते.
या खटल्याचे कामकाज कराडच्या प्रथम वर्ग अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश यु. एल. जोशी यांच्यासमोर चालले. सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता पुष्पा जितेंद्र जाधव यांनी जोरदार युक्तिवाद करत काही खटल्यांचे दाखलेही कोर्टासमोर मांडले. या खटल्यात 11 साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, पंच, तपासी अंमलदार यांच्या साक्षी ग्राह्य धरून कराडच्या प्रथमवर्ग अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश यु. एल. जोशी यांनी तिन्ही आरोपींना दोन वर्षे कारावास व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावली आहे.
या खटल्यात सरकार पक्षास कराड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल एम. एन. मठपती यांनी सहकार्य केले.