कोरेगाव : शहरालगतच्या परिसरात बिबट्या आणि त्याच्या बछड्यांचा वाढता वावर समोर येत असून स्थानिक नागरिक आणि शेतकरी यांच्यात भीतीचे वातावरण आहे. या परिस्थितीत वनविभागाने तातडीने पुढाकार घेऊन बिबट्याला जेरबंद करावे आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे यांनी केली.
बुधवारी दुपारी बर्गे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक शेतकरी आणि नागरिकांच्या शिष्टमंडळाने वनक्षेत्रपाल चंद्रहार जगदाळे यांच्याशी बिबट्याच्या धोक्याबाबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर शिष्टमंडळाने महावितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालयात जाऊन उपकार्यकारी अभियंता प्रदीप निकम यांच्यासोबतही संवाद साधला.
या शिष्टमंडळात माजी उपनगराध्यक्ष सुनीलदादा बर्गे, माजी नगरसेवक सचिनभैय्या बर्गे, नगरसेवक साईप्रसाद बर्गे, राजेंद्र वैराट, संतोष बर्गे, भाजपचे शहराध्यक्ष दीपक फाळके, साहेब युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष विजय घोरपडे, पृथ्वीराज बर्गे, राजेश बर्गे, गिरीष शेटे व रोहन जाधव आदी सहभागी होते.
राहुल बर्गे यांनी सांगितले की, बिबट्याचा वावर निश्चित झाला असून त्याचे ठसेही वनविभागाने तपासून पुष्टी केली आहे. संबंधित बिबट्या अंदाजे दोन ते अडीच वर्षांचा असल्याचे प्राथमिक अनुमान असून त्याला पकडण्यासाठी तातडीने पिंजरा लावणे, गस्त वाढवणे आणि संवेदनशील भागात सतर्कता वाढवणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या भागातील शेतकरी आणि नागरिकांना येणाऱ्या अडचणींचे सविस्तर वर्णन केले.
वनक्षेत्रपाल जगदाळे यांनी सांगितले की, ऊसतोडणी निवासी परिसरात प्राधान्याने झाली, तर बिबट्या मानवसदृश्य वस्तीच्या दिशेने येण्याची शक्यता कमी होते. यासाठी वनविभागाने संबंधित साखर कारखान्यांना लेखी पत्र देत आवश्यक सूचना केल्या आहेत.
सध्या शेतकऱ्यांना शेतीपंपांसाठी रात्री वीजपुरवठा होत असल्याने ते रात्री शेतात जातात आणि बिबट्याच्या हल्ल्याचा धोका वाढतो. हा पुरवठा दिवसाच्या वेळेत करावा, अशी मागणी शिष्टमंडळाने महावितरणकडे केली.या मागणीची दखल घेत निकम यांनी अधीक्षक अभियंता बाळासाहेब हाळनोर आणि सातारा विभागाचे कार्यकारी अभियंता डॉ. अमित बारटक्के यांच्याशी तातडीने चर्चा करून प्रस्ताव सादर करण्याचे आश्वासन दिले.