सातारा जिल्‍ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा डबलबार

by Team Satara Today | published on : 22 October 2024


सातारा : सातारा जिल्‍ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाईचा डबलबार करत लाच घेणार्‍यांचा पर्दाफाश केला. भूमी अभिलेख खंडाळ्याच्या उपअधीक्षक उर्मिला गलांडे व स्‍विटी उमाप या कंत्राटी कर्मचारी महिलांना ७५ हजार रुपये घेताना तर गाेंदवले येथील महावितरणचा लाईन हेल्‍पर विशाल जाधव याला ६०० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. दरम्‍यान, एसीबीच्या या कारवाईने प्रशाशनामध्ये खळबळ उडाली आहे.

उर्मिला अशोक गलांडे (वय ४७, सध्या रा. बुधवार पेठ, पुणे) व स्‍विटी उर्फ साक्षी शिवाजी उमप (वय २८, मूळ रा. श्रीरामपूर जि.अहमदनगर) या दोघी सध्या भूमी अभिलेख खंडाळा कार्यालयात सेवा बजावत आहेत. या प्रकरणातील तक्रारदार यांचे लाेणंद येथे सिटी सर्वेच्या मिळकतीवर चुकून सत्ता ब प्रकाराची नोंद लागली होती. ती नोंद रद्द करायची असल्‍याने वाई, खंडाळा येथील शासकीय कार्यालयातून उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय खंडाळा यांच्याकडे चौकशी करुन त्‍यासंबंधीचा अभिप्राय मागवण्यात आला होता.

याच कामासाठी तक्रारदार खंडाळा येथील भूमी अभिलेख कार्यालयात गेले होते. मात्र भूमी अभिलेखच्या उपअधीक्षक उर्मिला गलांडे यांनी सत्ता ब प्रकाराची नोंद सत्ता अ करण्यासाठी १ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. यामुळे तक्रारदार यांनी सातारा एसीबी कार्यालयात तक्रार केली. तक्रार दाखल झाल्‍यानंतर पडताळणी केली असता लाचेची मागणी झाल्‍याचे स्‍पष्ट झाले. तडजोडीअंती ७५ हजार रुपयांची लाचेची रक्‍कम निश्चित झाल्‍यानंतर रक्‍कम मंगळवारी घेण्याचे ठरले. त्‍यानुसार तक्रारदार यांना लाचेची रक्‍कम स्‍विटी उमप यांना देण्यास सांगितले. कार्यालयातच लाचेची रक्‍कम स्‍वीकारल्‍यानंतर एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. खंडाळा पोलिस ठाण्यात दोघींवर गुन्‍हा दाखल करण्यात आला.

दुसरी कारवाई विशाल लाला जाधव (वय २७, रा. पळशी ता.माण) याच्यावर करण्यात आली आहे. या प्रकरणातील तक्रारदार हे शेतकरी आहेत. डीपी नवीन बसवण्यासाठी लागणारा खर्च म्‍हणून ६०० रुपयांच्या लाचेची मागणी केली. यामुळे तक्रारदार यांनी एसीबीत तक्रार दाखल केली. एसीबीने तक्रारीची पडताळणी केली असता लाचेची मागणी असल्‍याचे स्‍पष्ट झाले. पळशी येथेच लाच स्‍वीकारल्‍यानंतर एसीबी विभागाने त्‍याला रंगेहाथ पकडले. म्‍हसवड पोलिस ठाण्यात त्‍याच्या विरुध्द गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.

या दोन्‍ही कारवाई एसीबीचे पोलिस उपअधीक्षक राजेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि श्रीधर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. दरम्‍यान, सातारा शहरासह जिल्‍ह्यात कुठेही शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी लाचेची मागणी केल्‍यास १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
विधानसभा निवडणुकीसाठी आज ६ अर्ज दाखल
पुढील बातमी
धामणी येथे विवाहितेची दोन चिमुकल्यांसह तलावात आत्महत्या

संबंधित बातम्या