पालखी महामार्गावर अपघातात काळजचे पती-पत्नी जागीच ठार; महामार्ग की मृत्यूचा सापळा ?

by Team Satara Today | published on : 05 April 2026


फलटण : पालखी महामार्गावर काळज (ता. फलटण) गावच्या हद्दीत जुन्या डोंबाळवाडी फाट्यानजीक भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने पती-पत्नी जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

मृतांमध्ये बाळू तुकाराम गाढवे (वय ५५) आणि पुष्पा बाळू गाढवे (वय ५०, दोघे रा. काळज, ता. फलटण, जि. सातारा) यांचा समावेश आहे. दोघेही दुचाकी (क्र. एमएच ११ सीएम ७२६८) वरून प्रवास करत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या कार (क्र. एमएच ११ डीयू ९१२८) ने त्यांना उडविले. धडकेची तीव्रता इतकी होती की दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याप्रकरणी मल्हारी आण्णा गाढवे यांनी फिर्याद दिली असून कारचालक संभाजी जीनदास झिमल (रा. गंगोती, ता. माण) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच लोणंद पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आले आहेत.

पालखी महामार्गावरील अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. अनेक ठिकाणी सदोष रचना, तसेच छोट्या वाड्या-वस्त्यांवर जाण्यासाठी भुयारी मार्ग किंवा उड्डाणपूल नसल्याने स्थानिकांना जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडावा लागतो. परिणामी, शॉर्टकटच्या नादात निष्पाप नागरिकांचे जीव जात असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा महामार्ग ‘मृत्यूचा सापळा’ ठरत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
फलटण तालुक्यात अवकाळीने ऊस, मका, कांदा, गहू पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान; आ. सचिन पाटील यांनी केली पाहणी; तात्काळ पंचनामे करण्याचा आदेश
पुढील बातमी
कराड शहर व परिसरात नोकरी लावण्याच्या आमिषाने अनेकजणांना गंडा घालणारा भामटा गजाआड; राजस्थान येथून अटक

संबंधित बातम्या