सातारा : कास तलावाला मोठ्या प्रमाणावर लागलेली गळती व सांबरवाडी व पावर हाऊस येथील पाईप लाईन शिफ्टिंग चे काम यामुळे दिनांक 16 व 17 रोजी शहराच्या पश्चिम भागाला होणारा पाणीपुरवठा होऊ शकणार नाही, अशी माहिती सातारा पालिका प्रशासन अधिकारी अभिजीत बापट यांनी दिली आहे.
पाणीपुरवठा विभागाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद आहे की, सांबरवाडी येथील मेन पाईप लाईन शिफ्ट करणे तसेच काही ठिकाणी लागलेली गळती यामुळे तातडीचे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. गुरुवार दिनांक 16 रोजी सातारा शहरातील सायंकाळच्या सत्रात कास तलावाच्या माध्यमातून होणारा पाणीपुरवठा विशेषतः पोळ वस्ती, संत कबीर सोसायटी तसेच डोंगराळ भागातील बालाजी नगर, कांबळे वस्ती, जांभळे वाडा व कात्रेवाडा टाकी माध्यमातील परिसराला पाणीपुरवठा होणार नाही.
शुक्रवार दिनांक 17 जानेवारी रोजी पॉवर हाऊस येथून पाणीपुरवठा होणाऱ्या यादोगोपाळ पेठ, मंगळवार पेठ या भागातील नागरिक तसेच कात्रेवाडा टाकी, गुरुकुल टाकी, व्यंकटपुरा टाकी, भैरोबा टाकी व कोटेश्वर टाकी या भागाला पाणीपुरवठा होणार नाही. नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा वापर काटकसरीने करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.